हडपसरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, पती अटकेत

भेकराईनगर परिसरात धक्कादायक घटना

मुलांच्या कारणावरून सतत वाद, शेवटी टोकाचे पाऊल

हडपसर येथील भेकराईनगर परिसरात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. कौटुंबिक वाद आणि मुलांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. घटनेनंतर फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पुणे : हडपसर येथील भेकराईनगर परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आकाश विष्णू दोडके (वय 35) या खासगी वाहन चालकाला फुरसुंगी पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली आहे. प्रियंका (वय 27) असे मृत महिलेचे नाव आहे.

फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके यांनी शुक्रवारी रात्री उशिरा थेट हडपसर पोलिस ठाण्यात जाऊन पत्नीचा घरातच खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी फुरसुंगी पोलिस ठाण्यात वर्ग केले.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले आणि दोडके याने दोरीने पत्नीचा गळा दाबून खून केला. नुकतेच दौंडहून पुण्यात आलेले हे दाम्पत्य मुलांच्या मुद्द्यावरून वारंवार वाद घालत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी गर्भधारणा करू शकत नाही या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. याच तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेनंतर मृत प्रियांकाचा भाऊ सागर अडागळे (वय 35) याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.