वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
नारायण राणे हा वटवृक्ष आहे. नारायण राणेंचा विश्वास आणि प्रेमाची पाळे-मुळे कोकणात खोलवर रूजलेली आहेत. राणेंना विरोध करणाऱ्यांकडे चार-दोन कार्यकर्ते पैशासाठी जमा होऊ शकतात. एक बाब स्पष्ट आहे. कोणत्याही नेत्याच्या अवती-भवती पैशासाठी गोळा झालेले कार्यकर्ते त्याचे नसतात तर पैशासाठी जमा झालेली ती भुतावळ असते. आर्थिकतेवर आधारलेली मैत्री, स्नेह दिर्घकाळ कधीच टिकत नाही. त्याला निश्चितपणे मर्यादा येतात. राणेंच राजकारण हे त्यांच्यावर जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यात आहे. ‘राणे समर्थक’ ही एक मजबुत ताकद कोकणच्या राजकिय, सामाजिक क्षेत्रात आहे. खा. नारायण राणे यांच्याबरोबरच पालकमंत्री नितेश राणे, आ.निलेश राणे यांचे राजकारण आणि राजकारणातील स्थान कोणी कितीही प्रयत्न केले तरीही बाजूला करता येणार नाही!
१९९० पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी कोकण नव्हतं. काँग्रेसी सत्तेच्याकाळात स्व.बाळासाहेब सावंत,कै. भाईसाहेब सावंत, कै. बापूसाहेब प्रभुगावकर, अॅड.एस.एन.देसाई, अॅड. ल.र. हातणकर हे राज्यात मंत्री राहिले. तर अमृतराव राणे, केशवराव राणे, शिवराम राजे भोसले असे आमदार राहिले. यात कै.केशवराव राणे हे अखंड रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. अशा सर्वांनीच त्यांच्या-त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कोकणच्या विकासात हातभार लावला. कै.भाईसाहेब सावंत, कै.एस.एन.देसाई यांनी आरोग्य आणि उद्योगांच्याबाबतीत प्रयत्न केले. खासदार म्हणून कै. प्रा.मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे सारखा प्रकल्प कोकणात पूर्णत्वाला जावा यासाठी प्रयत्न केले. यामुळे कोकणच्या विकासाचे निश्चितच अनेक वाटेकरी आहेत. बॅ.ए.आर.अंतुले यांना १८ महिन्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी मिळाला. बॅ. ए.आर.अंतुले हे प्रचंड निर्णय क्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती बॅ. अंतुलेंच्या काळातच झाली. सागरी महामार्ग हा त्यांचेच स्वप्न. परंतु कोकणच्या दुर्दैवाने बॅ. अंतुले यांना अधिकचा काळ मिळाला नाही. परंतु मधल्या अनेक वर्षात राज्यात कोकणच दमदार नेतृत्व नव्हतं. १९९० साली विद्यमान खासदार नारायण राणे यांची कोकणात एन्ट्री झाली. १९९० मध्ये कणकवली-मालवणचे आमदार म्हणून निवडून आले. १९९० ते २०२४ पर्यंत सर्व निवडणुकांमध्ये खा.नारायण राणे यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची छाप राहिली. गेली ३५ वर्षे कोकणच्या राजकारणात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नारायण राणे नावाच वादळ घोंघावत राहिलय. मुंबई महानगरपालिका नगरसेवक ते लोकसभेचे खासदार राज्यात मंत्री, केंद्रात मंत्री, विधानसभा, विधान परिषद, आमदार असं चार राजकिय वर्तुळ नारायण राणे यांनी पूर्ण केलं आहे. हे सर्व एक दिवसात किंवा पाच वर्षात मिळालेलं नाही. त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करतच त्यांची वाटचाल होत राहिली. राजकारणातील बदलते वारे लक्षात घेऊन त्यांनी काही पक्षिय बदलाचे निर्णय जरूर घेतले. परंतु त्यामागेही निश्चितपणे कोकण हिताचाच विचार होता. १९९५ पासून कोकणचे राजकारण नारायण राणे या नावाभोवतीच फिरत राहिले. नारायण राणे यांना अनेकदा नानाविध प्रकारे संघर्षाला उभं रहावं लागलं. अनेक घटनांमध्ये त्यांचा दूरान्वयेही कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर नावावर नेऊन चिकटविण्यात आले. अनेक राणे विरोधकांनी त्यांना दहशतवादी ठरवलं. परंतु कोकणातील जनतेने मात्र नारायण राणे यांच्या पाठीशी खंबिरपणे उभं रहाणं पसंद केलं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. कुडाळ-मालवणमधील पराभव हा लोकांनी राणेंच्या कार्यकर्त्यांवर असलेला राग राणेंचा पराभव करण्यात झाला. परंतु तत्पूर्वी आणि तद्नंतर राणेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
युती असेल किंवा आघाडी असेल. राणे नेहमीच त्या-त्यावेळी प्रामाणिक राहिले. त्याची खा.नारायण राणे यांची दोन उदाहरण सांगतो. तेव्हा नारायण राणे शिवसेनेत होते. शिवसेना-भाजपा युती होती. शिवसेना भाजपाचे देवगड मतदार संघाचे आमदार होते. आप्पासाहेब गोगटे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. परंतु त्या निवडणुकीत कै. नारायण उपरकर या कट्टर शिवसैनिकाने आप्पासाहेब गोगटे विरोधात निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. नारायण उपरकर याच्या उमेदवारीला देवगड मतदार संघातील शिवसैनिकांचा सपोर्ट होता. देवगडात भाजप पेक्षाही शिवसेना तेव्हा अधिक मजबुत होती. कडवट शिवसैनिकांची फौज होती. तर या निवडणुकीत आप्पासाहेब गोगटे यांना पराभव पत्करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली. ही बाब त्यावेळचे शिवसेनेचे नेते नारायण राणे यांच्या लक्षात येताच राणे यांनी निरोमचे कै.अनंत राऊत, वारगावचे कै.बाळा वळंजु यांना कामाला लावत ही मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी त्यावेळचे नारायण राणे यांचे निकटवर्तीय गौरीशंकर खोत यांच्यावर सोपवण्यात आली. देवगडात काका राऊत, बाळ खडपे अशा नाराजाना विश्वासात घेत कोणत्याही स्थितीत भाजपाचे आप्पासाहेब गोगटे विजयी झालेच पाहिजे यासाठी सारी शक्ती लावली. आणि त्या निवडणुकीत सेना-भाजपा युतीचे आप्पासाहेब गोगटे ९ हजार मतांनी विजयी झाले. हे जुन्या-जाणत्या भाजपायींना आठवत असेल. दुसऱ्यावेळी देवगड मतदारसंघातच माजी आमदार अजित गोगटे आणि कै. कुलदिप पेडणेकर यांच्यामध्ये लढत झाली. अॅड. अजित गोगटे यांचा पराभव होताना वाचले ते देखिल खा.नारायण राणे यांच्यामुळेच आचरा आणि नांदगाव, खारेपाटण विभागातील शिवसैनिकांना जेव्हा अजित गोगटे पराभूत होणार हे लक्षात आले तेव्हा शिवसैनिकांना कामाला लावले. कोणत्याही स्थितीत अजित गोगटे निवडून यायलाच हवेत असा आपुलकीचा दम नारायण राणे यांनी शिवसैनिकांना दिला आणि मग दादांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून सारे कामाला लागले. अॅड. अजित गोगटे अवघ्या हजार-बाराशे मतांनी निवडून आले. पूर्वीच्या भाजपायींना हे आठवत असेल राणे कधी गद्दारी करत नाहीत. ‘मुँह में राम बगल में छुरी’ असल पाठीत वार करणार नाहीत. जे मनात तेच ओटात. म्हणूनच अनेकवेळा छुपेपणाचे काँग्रेसी राजकारण खा.नारायण राणे असतील किंवा पालकमंत्री ना.नितेश राणे वा आ.निलेश राणे यातल्या कोणालाच दुतोंडी राजकारण कधी जमल नाही. मग नुकसान होऊ देत किंवा फायदा जे काही व्हायच असेल ते होऊ दे त्याची चिंता कधी कोणतेच राणे करीत नाहीत. ज्या पक्षात खा.नारायण राणे असतील त्या पक्षात ते प्रामाणिक असतात. शिवसेनेत, काँग्रेस पक्षात किंवा भाजपामध्येही राणेंना त्रास हा स्वकीयांचाच अधिक राहिला. परंतु राणेंच राजकारण पैशाचे नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हिच त्यांच्या राजकारणाची शिदोरी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे वगळून कोणीही उमेदवार असता तर दोन तीन लाखांनी पराभूत झाला असता. फक्त दादांच्या प्रेमापोटी लोकांनी मतदान केले हे कोणालाही नाकारता येणार नाही.नारायण राणे हा वटवृक्ष आहे. नारायण राणेंचा विश्वास आणि प्रेमाची पाळे-मुळे कोकणात खोलवर रूजलेली आहेत. राणेंना विरोध करणाऱ्यांकडे चार-दोन कार्यकर्ते पैशासाठी जमा होऊ शकतात. एक बाब स्पष्ट आहे. कोणत्याही नेत्याच्या अवती-भवती पैशासाठी गोळा झालेले कार्यकर्ते त्याचे नसतात तर पैशासाठी जमा झालेली ती भुतावळ असते. आर्थिकतेवर आधारलेली मैत्री, स्नेह दिर्घकाळ कधीच टिकत नाही. त्याला निश्चितपणे मर्यादा येतात. राणेंच राजकारण हे त्यांच्यावर जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यात आहे. ‘राणे समर्थक’ ही एक मजबुत ताकद कोकणच्या राजकिय, सामाजिक क्षेत्रात आहे. खा. नारायण राणे यांच्याबरोबरच पालकमंत्री नितेश राणे, आ.निलेश राणे यांच राजकारण आणि राजकारणातील स्थान कोणी कितीही प्रयत्न केले तरीही बाजूला करता येणार नाही. खा. नारायण राणे यांच स्थान कुणाला घेता येणार नाही.राणे असणारच आहेत. कोकणात राणे काल होते, आज आहेतच. आणि उद्याच्या राजकारणातही राणेंना बाजुला ठेवून कुणाला राजकारण करता येणार नाही. त्यामुळे उद्याही कोकणात राणेच असणारच !












