झाडे, फुले फळांचा अभ्यास आणि पक्षीनिरीक्षण

वनभोजनाच्या निमित्ताने पाट शाळेतील विद्यार्थ्यांची धम्माल

परुळे : प्रतिनिधी

शालेय उपक्रमातील दरवर्षीचा सर्वात आवडीचा विषय असलेल्या वनभोजनाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील पाट नंबर १ शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच धमाल मस्ती केली. विस्तीर्ण आंबा कलम बागेतील झाडे, फुले, फळांचा अभ्यास करताना बारकाईने पक्षी निरीक्षणही केले. शिक्षकांबरोबरच पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.

 

शाळेपासून जवळपासच्या अंतरावर असलेल्या मंदार प्रभू पाटकर यांच्या आंबा कलम बागेतील निसर्गरम्य शांतता पूर्ण परिसर या उपक्रमासाठी निवडण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी थंडी असूनही मोठ्या उत्साहाने ठरलेल्या जागेवर आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली. बागेत पोहोचल्यावर एकमेकांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच काही सांगून जात होता. नेहमीच्या शाळेतील अभ्यासाला सुट्टी देत एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात रमत मुलांच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुख्याध्यापक सुशीलकुमार ठाकूर, सहशिक्षिका दिव्या पिंगुळकर यांच्या सूचनांचे पालन करत मग विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली.

सकाळच्या सत्रात ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांनी विविध झाडांची, फळांची माहिती जाणून घेतली. विविध रंगी पक्षांची नावे त्यांच्या मधुर शिळा ऐकण्याचा आनंदही या निमित्ताने घेतला.

 

विश्रांती दरम्यान भेळ खाण्याचा आनंद घेतला. बागेतील डोंगराळ भागात शिक्षकांत समवेत चालत वनाची सैरही केली. लांबलचक भरपूर चालून आलेल्या मुलांनी मग ‘धुवा हातपाय बसा भोजनाला’ या स्वच्छता नियमाचे पालन करत दुपारच्या चिकन जेवणावर येथेच ताव मारला. काही काळ सावलीत विश्रांती घेत मग सर्वांनीच आठवणी मनात साठवून घरची वाट धरली.

 

बैठे आणि जुने खेळ

 

आई तुझा रुमाल हरवला, पोपटा पोपटा तुझा रंग कोणता, आंधळी कोशिंबीर, साप शिडी, दगड गोट्यांचे खेळ, पकडापकडी, नारळाच्या करवंटीचा वापर करून लगोरी, आबा धोबी यासारखे पारंपारिक जुने आणि बैठे खेळ करत या उपक्रमाचा पुरेपूर आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.