​रत्नागिरी: टीटीचे इंजेक्शन घेतल्यावर प्रकृती बिघडून ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू

रत्नागिरी: पायला दुखापत झाल्यामुळे टीटीचे (धनुर्वात) इंजेक्शन घेतल्यानंतर काही वेळातच एका ६७ वर्षीय वृद्ध महिलेची प्रकृती खालावून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. रेखा शिवाजी शिंदे (वय ६७, रा. प्रशांत नगर, मजगाव रोड, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर २०२५ रोजी रेखा शिंदे यांच्या पायाला जखम झाली होती. त्यावर उपचार करण्यासाठी त्या सकाळी कोकणनगर येथील डॉ. गुलाम ढालायत यांच्याकडे गेल्या होत्या. तेथे त्यांनी टीटीचे इंजेक्शन घेतले आणि त्या घरी परतल्या. काही वेळाने त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांच्या अंगावर लाल चट्टे उमटू लागले. ही बाब त्यांच्या सुनेने तात्काळ पती गणेश शिंदे यांना फोन करून कळवली.
​गणेश शिंदे यांनी तातडीने घरी धाव घेतली असता, त्यांची आई बेशुद्ध पडली होती आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने लोटलीकर हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तेथे आपत्कालीन डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेण्यास सांगण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रेखा शिंदे यांना दुपारी १२.०१ वाजता ‘मृत’ घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याचे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे २८ डिसेंबर दुपारी २.१९ वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.