▪️राकेश परब मित्रमंडळाचे यशस्वी आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब आणि मित्रमंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील चुनवरे मळा येथे २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत भव्य अशा चुनवरे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘येवा कार्यक्रम आपलोच आसा!’ या घोषवाक्याखाली तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक, नाट्य व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली. राकेश परब यांच्या महोत्सव आयोजित करण्याच्या संकल्पनेचे कौतुक होतं आहे.
२५ डिसेंबर रोजी सायंकाळी चित्ररथ यात्रा पोईप बाजारपेठ ते चुनवरे मळादरम्यान काढण्यात आली . या यात्रेत चित्ररथ, ढोल-ताशांचा गजर, दिंडी यांचा सहभाग होता रात्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाबँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. बिडीओ शाम चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सरपंच शमिका वाडकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, ओमप्रकाश चव्हाण यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रात्री भन्नाट विनोदी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ सादर झाले . या नाटकात मनमीत पेम, मयुरेश पेम, विकास पाटील, रिचा अग्निहोत्री या कलाकारानी प्रेक्षकांना खळखळून हसवले .
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी स्मार्ट सुनबाई स्पर्धा (प्रत्येक वाडीमध्ये), रात्री वाजता साई कलामंच निर्मित, साईनाथ एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला . या कार्यक्रमात कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, भारूड, गोंधळ, पोवाडा, दशावतार, शिमगा, वारकरी परंपरा अशा महाराष्ट्राच्या विविध लोककला सादर झाल्या.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी २७ डिसेंबर रोजी रात्री स्मार्ट सुनबाई महाअंतिम सोहळा झाला . रात्री वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर निर्मित ‘जोगुलांबा’ हे पौराणिक व ट्रिकसीनयुक्त नाटक सादर करण्यात आले . या तीन दिवसीय महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमा बद्दल ग्रामस्थांनी धन्यवाद देत पुढील वर्षी सुद्धा अशा महोत्सवाचे आयोजन व्हावे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.महोत्सव यशस्वीतेसाठी राकेश परब मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली










