चिपळूण शहराच्या विकासासाठी क्रीडाईचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निवेदन

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा संघटनेतर्फे सत्कार व शुभेच्छा

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण क्रीडाई (CREDAI) संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांची शनिवारी त्यांच्या माऊली संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी शहर विकासाला अडथळा ठरणारे विविध प्रश्न तसेच महापुराच्या पार्श्वभूमीवर चिपळूण व राजापूरला शासनस्तरीय समितीत प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी नगराध्यक्षांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंती क्रीडाईच्या वतीने करण्यात आली.

चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडाई चिपळूण संस्थेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी रेड लाईन–ब्ल्यू लाईनचा प्रश्न, चिपळूण शहरातील गाळमुक्ती तसेच पूरप्रश्न यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

तसेच क्रीडाई चिपळूणच्या वतीने पाच जणांचे शिष्टमंडळ तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येईल. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून चिपळूण शहराच्या विकासाला अडथळा ठरणारे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.

या भेटीवेळी क्रीडाई चिपळूणचे अध्यक्ष शकील चौगुले, सदस्य व नगरसेवक उदय जुवळे, राजेश वाजे, जावेद दलवाई, माजी अध्यक्ष संतोष तडसरे, शकील मुकादम, प्रकाश देसाई, बळीराम मोरे, प्रीतम पटेल, मनोज भोजने, मारुती मोरे, साहिल खळे, मयूर देसाई, नगरसेवक अंकुश आवले आदी उपस्थित होते.