कोळकेवाडी येथील दोघां शेतकऱ्यांनी ‘ऑरगॅनिक शेती’चा राबवला यशस्वी पॅटर्न!

कृषी क्षेत्राकडे ‘बिझनेस मॉडेल’ म्हणून पहावे

चिपळूण (संतोष सावर्डेकर):- कोकणातील कृषी उद्योग पारंपारिक पिकांवर आधारित असला तरी तो एकात्मिक आणि आधुनिक दृष्टीने स्वीकारत आहे. कोळकेवाडी येथील दोघांनी सुमारे ४० एकरावर पारंपरिक शेतीला छेद देत ‘ऑरगॅनिक शेती’ चा पॅटर्न राबवून कोकणातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या शेतीबरोबरच ४५ गीरगायींचा गोठा उभारून दुग्ध व्यवसाय देखील यशस्वी केला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी पडीक क्षेत्रात व्यावसायिकतेच्या दृष्टीने शेती करावी, असे आवाहन कोळकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी गिरीश साठे, अतुल भागवत यांनी केले आहे.

कृषी ‘बिझनेस मॉडेल’ ठरेल

कोकणामध्ये पडीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रात हंगामानुसार शेती, भाजीपाला अजून आणखी मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यास कृषीच्या माध्यमातून मोठी अर्थक्रांती होऊ शकते. तसेच उद्योग क्षेत्रात अधून -मधून मंदी असते. तर कृषी व्यवसाय हा मुख्य व्यवसाय होऊ शकतो. ‘ऑरगॅनिक शेती’ ला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे ‘ऑरगॅनिक शेती’च्या उत्पादनाला चांगले मूल्य देखील मिळते. त्यामुळे शेती कृषी क्षेत्रात ऑरगॅनिक शेती हा उत्तम पर्याय आहे. कृषी ‘बिझनेस मॉडेल’ ठरू शकतो, ही बाब लक्षात घेऊन कोळकेवाडी येथील शेतकरी गिरीश साठे, अतुल भागवत या दोघांनी ‘ऑरगॅनिक शेती’चा पर्याय निवडला.

शेतीसाठी पाणी, वीज नियोजनाला प्राधान्य

यामध्ये गिरीश साठे यांच्या मालकीच्या क्षेत्रात या दोघांनी एकत्र येऊन गेल्या पाच वर्षांपासून ‘ऑरगॅनिक शेती’ केली आहे. यामध्ये शेती म्हटले की, पाणी आले. यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या सहकार्याने ५५ लाख लिटर क्षमतेची तीन शेततळी उभारण्यात आली आहेत. तर शेतीला पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने चार इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर उभे करण्यात आले आहेत. या विजेच्या साहाय्याने तीन शेततळ्यांमधील पाणी शेतीला पुरवले जाते. यामुळे शेतीला पाण्याचा योग्य पुरवठा होत आहे. यातून सुमारे ४० एकरावर ‘ऑरगॅनिक शेती’ बहरली आहे.

दुग्ध व्यवसायात यश

ऑरगॅनिक शेतीबरोबरच ४० एकराच्या क्षेत्रात ४५ गीरगायींचा गोठा उभारला आहे. या गाईंच्या चाऱ्याची व्यवस्था देखील या क्षेत्रात करण्यात आली आहे. या गाईंचे दूध वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात संकलित जाते. यातून मिळत असलेल्या उत्पादनातून गाईंचे संगोपन व्यवस्थापन व इतर खर्चाचा ताळमेळ व्यवस्थितरित्या बसत आहे, अशी माहिती या तीन शेतकऱ्यांनी दिली.

ऑरगॅनिक शेती

कोळकेवाडी येथील या दोघांनी २१ एकरावर बांबू लागवड केली आहे. तर ९ एकरावर ऊस लागवड ४ एकरावर आल्याची लागवड केली आहे. ऊस लागवडीतून गुळ उत्पादन घेतले जाते. यासाठी युनिटची देखील उभारणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी तब्बल २९ टन गुळ उत्पादित केले गेले. रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, खेड येथे ‘गुळामृत’ या ‘ब्रँड’ ने गुळाची विक्री करण्यात आली. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस, चिपळूण आयोजित कृषी महोत्सवात देखील या शेतकऱ्यांना स्टॉल्स उपलब्ध करण्यात आला होता. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील गुळ, आला याची चांगलीच विक्री केली. यातून या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले. एकंदरीत २९ टन गुळ विक्रीतून सुमारे २६ ते २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी केवळ अर्धा एकरावर आल्याचे उत्पादन घेण्यात आले होते. यातून सुमारे ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षीचे आल्याचे क्षेत्र वाढवण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात हैदराबाद, सुरत, बेळगाव यासारख्या शहरात आले विक्रीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती श्री. साठे व श्री. भागवत यांनी दिली. सुगंधी तेलाचे युनिट देखील या शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. तर बांबू या वर्षी मार्केटला पाठवला जाणार आहे. यातून शेतीच्या माध्यमातून १४ ते २० मजुरांना काम मिळाले आहे. या मजुरांच्या कुटुंबियांचे अर्थाजन होत आहे. कोळकेवाडी येथील या दोन शेतकऱ्यांनी यशस्वीपणे ऑरगॅनिक शेतीच्या पॅटर्न राबवल्यास असल्याने सुमारे ४० एकरावर ही शेती बहरली असल्याने हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. विशेष म्हणजे या प्रक्षेत्रात मोर जातीच्या पक्षाचे वरच्यावर दर्शन होत असल्याने सुखद आनंद मिळत आहे.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मिळतेय दिशा

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे दरवर्षीच्या नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात कृषी महोत्सव आयोजित केले जाते. या महोत्सवात आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाच्या विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध केला जात आहे. आमच्या ऑरगॅनिक शेतीच्या उत्पादनाची विक्रीतून चांगले उत्पादन मिळत आहे. विशेष म्हणजे आमच्या गुळाच्या ‘गुळामृत’ ब्रँडचे चांगले मार्केटिंग झाले आहे. तसेच आमच्या प्रकल्पातील गीरगायींचे दूध खरेदी केले जात असल्याने उत्पन्न वाढीस मदत होत आहे, अशी माहिती साठे, भागवत या दोन शेतकऱ्यांनी दिली. कृषी महोत्सवात कोकणातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची स्टॉल्स असल्याने शेतकऱ्यांना शेती व शेती पूरक व्यवसायासाठी दिशा मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राकडे ‘बिझनेस मॉडेल’ म्हणून पहावे, असे आवाहन या श्री. साठे व श्री. भागवत या दोन शेतकऱ्यांनी केले आहे.