शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे मांडणार शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा
सावंतवाडी । प्रतिनिधी :येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने ९ व्या ‘शिवजागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्यात ‘धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रसिद्ध शिवचरित्रकार आणि हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यामध्ये शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा मांडणार आहेत.
स्वराज्य स्थापनेपूर्वी मुघल, आदिलशाही आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे येथील संस्कृती व धर्म धोक्यात आला होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याची स्थापनाच केली नाही, तर संस्कृतीचे रक्षण करून इतर धर्मांचा आदर करण्याचा आदर्शही जगाला घालून दिला. हाच प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला असून, आपल्या ओघवत्या वाणीतून इतिहास जिवंत करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत पन्हाळा ते पावनखिंड अशी पदभ्रमंती मोहीमही दरवर्षी राबवली जाते.
सिंधुमित्र प्रतिष्ठानने यापूर्वी शिवचरित्रातील विविध पैलूंवर ८ यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. हे ९ वे पुष्प ऐकण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. प्रवीणकुमार ठाकरे व केदार बांदेकर यांनी केले आहे.











