सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराला ३०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या त्रिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून, मंदिराचे निष्ठावंत पुजारी प्रमोद भागवत यांचा विशेष सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार विश्वनाथ (भाऊ) नाईक यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला.
सावंतवाडीतील हे विठ्ठल मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेली अनेक दशके भागवत कुटुंब या मंदिरात पुजारी म्हणून आपली सेवा अर्पण करत आहे. प्रमोद भागवत यांनीही आपल्या पूर्वजांचा वारसा जपत अत्यंत भक्तीभावाने मंदिराची व्यवस्था आणि पूजा-अर्चा सांभाळली आहे. मंदिराला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर, त्यांच्या या अविरत सेवेची दखल घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ विठ्ठलभक्त बंड्या धारगळकर, श्री. सावंत, राजन म्हाडेश्वर, बाबल डिचोलकर, रत्नाकर माळी, आनंद भोगण यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.या छोटेखानी परंतु प्रसन्न सोहळ्याला परिसरातील विठ्ठलभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या मंदिराने सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मोठी भर घातली आहे. यानिमित्ताने पुजाऱ्यांचा झालेला सत्कार हा त्यांच्या निस्पृह सेवेचा गौरव असल्याचे मत यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केले.










