​भरधाव दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू, तर सहकारी जखमी

​राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील आंबेरी पुलाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप शिवप्रसाद (वय २३, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. नाणार, राजापूर) असे मृताचे नाव असून, त्याच्यासोबत असलेला सहकारी गणेश रमेश घाडी (वय ३८, रा. तिवलोट, देवगड) हा या अपघातात जखमी झाला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप हा आपली मोटारसायकल (क्रमांक MH 07 K 7827) घेऊन सहकारी गणेश घाडी याला त्याच्या घरी सोडण्यासाठी निघाला होता. घोडपोई येथील तीव्र उतारावर दुचाकी चालवताना प्रदीपचे नियंत्रण सुटले. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरून भीषण अपघात झाला.
​या अपघातात प्रदीप आणि गणेश दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रदीपची प्रकृती खालावत गेली आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हेमंत सिताराम चव्हाण (वय ३८, रा. साखरी सडे) यांनी फिर्याद दिली असून, १ जानेवारी २०२६ रोजी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.