रब्बी हंगामासाठी पाणी नियोजी करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंचन वर्ष २०२५-२०२६ च्या रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन व पीक नियोजनाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत शेतकरी व पाणी वापर संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची गरज आणि पर्जन्यमान लक्षात घेऊन रब्बी हंगामात पाण्याचा न्याय्य व कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित पाणी वापर संस्था, शेतकरी आणि लाभार्थी यांनी आपल्या क्षेत्रातील प्रस्तावित पिकांचा तपशील, लागवड क्षेत्र आणि कालावधी याबाबत अपेक्षित पाण्याची मागणी लेखी अर्जाद्वारे सादर करणे गरजेचे आहे. हे पाणी मागणी अर्ज जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विभागाने स्पष्ट केले आहे की, मंजूर केलेल्या पाणी नियोजनाच्या व्यतिरिक्त किंवा विरुद्ध पाणी उपसा केल्यास अथवा अनधिकृत पाणी वापर केल्यास ‘महाराष्ट्र सिंचन अधिनियम, १९७६’ नुसार कारवाई करण्यात येईल. रब्बी हंगामातील पाण्याचे समन्यायी वाटप आणि पाणी पाळ्या सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग (आंबडपाल, कुडाळ) व पाल पाटबंधारे उपविभाग (सावंतवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.