खेड (प्रतिनिधी) – खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव येथे बालिका दिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून स्त्री शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक विभागातील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी अन्वी क्षीरसागर हिने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याविषयी दिलेल्या प्रभावी माहितीने झाली. त्यानंतर उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी राधा भागवत हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. विद्यार्थिनींच्या भाषणांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.
यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक थोरात मॅडम यांनी केले.
बालिका दिनानिमित्त इयत्ता अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’, ‘मुक्त मी स्वतंत्र मी’, ‘स्त्री खरंच सुरक्षित आहे का?’, ‘स्त्री – कुटुंबाचा आधारस्तंभ’, ‘घरातील लक्ष्मी ते देशाची आधारशिला’ आणि ‘स्त्री शक्ती – एक अविश्वसनीय ऊर्जा’ या विषयांवर विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले. या स्पर्धेसाठी सर्व महिला शिक्षिका तसेच वाघमोडे सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, तसेच विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे यांनी विशेष कौतुक केले. याचबरोबर संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
बालिका दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास निश्चितच चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.










