राजापूर (वार्ताहर): राजापूर पत्रकार संघ राजापूर (रजि.) च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार दि. ०६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार दिन व विशेष पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापूर नगर वाचनालय सभागृहात राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत, माजी आमदार डॉ. राजन साळवी, राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. सौ. हुस्नबानू खलिफे, तहसिलदार विकास गंबरे, पोलिस निरीक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी निलेश जगताप, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नगर वाचनालय राजापूरचे अध्यक्ष प्रभात पाध्ये आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १९३८ रोजी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. या दिवसाचे औचित्य साधून राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर राजापूर पत्रकार संघाचे वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव केला जाणार आहे.
यावेळी सर्वांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन राजापूर पत्रकार संघाचे वतीने उपाध्यक्ष राजन लाड, सचिव राजेद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर,खजिनदार शरद देसाई, सदस्य महेश शिवलकर, विनोद पवार, संतोष मोंडे, उमेश दळवी, संतोष शिंदे, राजेद्र जोगळे आदींनी केले आहे.












