वाशिष्ठी कृषी महोत्सव पाहिल्यांतर कोकण प्रगतीकडे झेप घेतोय!- खा. नारायण राणे

कृषी प्रदर्शन पाहून थक्क झालोय
प्रशांत यादव यांचे खा. राणेंकडून भरभरून कौतुक

चिपळूण (संतोष सावर्डेकर) : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवातून बरंच काही शिकण्यासारखे आहे. कोकण हा भाग बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित होता. मागासलेला प्रदेश, नोकरीसाठी मुंबई, पुणे सारख्या शहरात धाव घेणारा इथला तरुण असे या कोकणाकडे पाहिले जायचे. मात्र, आता कृषी महोत्सव पाहिल्यानंतर व वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादवांचे प्रास्ताविक ऐकल्यानंतर आता कोकण गरीब मागासलेला राहिला नाही. कोकण प्रगतीकडे झेप घेतोय असं चित्र अनुभवायला, पहायला मिळत आहे. कृषी प्रदर्शन पाहून थक्क झालो आहे, यादव यांचे आभार कोणत्या शब्दात मानू हेच कळत नाही. प्रशांत यादव कोकणवासींयांच्या हितासाठी योगदान देत आहेत. तेव्हा धन्यवाद हा शब्द अपुरा पडेल, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रशांत यादव यांचे भरभरून कौतुक केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवाचे व प्रवेशद्वाराचे उद‌्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर सौ. निलम राणे, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सह. दुध महासंघ मर्या. (महानंद)चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अनिरूद्ध निकम, चिपळूण नागरीच्या संचालिका ॲड. नयना पवार, तसेच शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी स्वागत केले.

खा. नारायण राणे पुढे म्हणाले की, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा ५१वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कोकण विकसित समृद्ध व्हावा, इथे शेती, दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थातून शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता यादव झटत असल्याचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, आपण सुक्ष्म, लघु उद्योग कारभार सांभाळत असताना अन्य राज्ये शेती, उद्योग क्षेत्रात पुढे असल्याचे दिसून आले. मात्र, कोकण मागे आहे. कोकणाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. मासेमारी होते, आंबा, काजू, फणस, नारळ, करवंदे, आवळे, जांभळे ही पिके घेतली जातात. एवढी बागायती आणि एवढं सगळं असताना इथला तरूण अन्य शहरांमध्ये धाव का घेतो आहे? याचा विचार करायला लावणारे हे प्रदर्शन आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरात वनौषधी वनस्पती आहे. याकडे आपण कधी ढुंकुनही पाहत नाही. आपण खासदार झाल्यानंतर केंद्रशासनाला पत्र लिहून याचा सर्व्हे करायला आपण सांगितले आहे. अहवाल येईल तेव्हा येईल. मात्र, या कृषी महोत्सवात कृषी अवजारे, वनौषधी वनस्पती, पिके, फळ बागायती यांची लागवड कशी करावी याची माहिती दिली गेली आहे.

चांगल्याचे अनुकरण करा

कोकणात तुम्हाला यायला वेळ लागला, असा प्रशांत यादव यांचा उल्लेख करून हा उपक्रम सुरू करायला वेळ लागला असेल. १०-१५ वर्षे अगोदर आला असतात तर कोकणातील अर्थव्यवस्था वेगळी असती, अशा शब्दात श्री. यादव यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. कोकणी माणसाला एक सवय आहे, चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही, चांगल्याचे कौतुक करायचे नाही. आतातरी चांगल्याचे अनुकरण करा. आपणदेखील चार झाडे लावली पाहिजेत. गोपालनसारखे व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवले पाहिजे. युरोपातील काही देश दुधावर श्रीमंत आहेत. डेन्मार्क या देशाची अर्थव्यवस्था दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. कोकणात ५ हजार मि.मी. पाऊस पडतो. शेतीसाठी पाणी उपयोगात आणू. गायी-म्हशी पाळू, दुग्धजन्य पदार्थ बनवू, यातून मुलाबाळांना शिकवण्यासाठी श्रीमंत होऊ, मुलांना डॉक्टर-इंजिनियर करू. एवढंच काय आयएएस, आयपीएस उद्योजक बनवू, असा संकल्प तुम्ही बाळगला पाहिजे.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आदर्शवत

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प तुमच्यासमोर यादवांनी आदर्शवत उभा केला आहे. कृषी महोत्सवात तुम्हासह मुलांना नुसतं फिरवू नका, या महोत्सवातून चांगलं काही करता येईल हे मुलांना समजावून सांगा. आपण केंद्रिय सुक्ष्म लघु उद्योग कारभार सांभाळला असताना या खात्यांतर्गत ७ कोटी ४० लाख उद्योग होते. कोकणात केवळ २ टक्के, उर्वरित उद्योग गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यात आहेत. आपण उद्योगाकडे वळत नाही. आपलं उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तुमचे कुटुंब सबळ, सुखी, समृद्धीसाठी प्रशांत यादव मेहनत घेत आहेत. आज त्यांचा ५१वा वाढदिवस आहे. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी त्यांच्या हातून चांगले उपक्रम घडावेत, अशी आपण सर्वांनी सदिच्छा व्यक्त करूया, असे खा. राणे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो तेव्हा ३५ हजार रूपये दरडोई उत्पन्न होते. आता ते २ लाख ६० हजार रूपये इतके झाले आहे. आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार असून रत्नागिरी जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढविण्याची आपलीही जबाबदारी आहे. ही जबाबदार नक्कीच पार पाडू. मात्र, तुमचे सहकार्य हवे. प्रशांत यादव देखील आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना तुम्ही साथ द्या, असे आवाहन खा. राणे यांनी यावेळी केले. कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मेळावे घेण्यास सांगितले आहे. यामध्ये शेतकरी, युवक, महिला, उद्योग या मेळाव्यांचा समावेश असून यातून या सर्वांना व्यवसायासाठी मार्गदर्शन होणार आहे, असे शेवटी सांगताना भारत देश पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १४ व्या क्रमांकावर होता. आता तो पाचव्या क्रमांकावर असून जपान, जर्मनीला मागे टाकून आपला देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास खा. नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांद यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

चौकट-
कृषी प्रदर्शनाने आपण भारावून गेलो- खा. नारायण राणे

या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाची दीपप्रज्वलनाने खा. नारायण राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सुरूवात झाली. कृषी महोत्सवाच्या प्रवेशद्वाराचे देखील खा. राणे यांच्या हस्ते फित कापून उद‌्घाटन झाले. यानंतर खा. नारायण राणे यांच्यासह सौ. निलम राणे व अन्य मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी खा. राणे यांनी या प्रदर्शनाचे भरभरून कौतुक करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या कृषी प्रदर्शनाने आपण भारावून गेलो असल्याचे खा. राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्प व कृषी महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी प्रदर्शनासंदर्भात प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी खा. राणे यांना माहिती दिली.