गावात स्वयंसेवकांनी केले उल्लेखनीय काम
वैभववाडी l प्रतिनिधी : एचएसएनसी विद्यापीठ संचालित के.सी. महाविद्यालय मुंबई चे राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक निवासी शिबीर करूळ येथे पार पडले. या शिबीरामध्ये सात दिवस विविध उपक्रम व कामे करण्यात आली. के. सी. महाविद्यालय व ग्रामपंचायत करूळ यांच्या वतीने शिबीरातील स्वयंसेवकांनी तीन बंधारे घातले. त्या बंधार्यामध्ये सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या बंधार्यामुळे गावातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या आहेत. तसेच बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी व पाळीव जनावरासाठी होत आहे. शिबिरांमधील विद्यार्थ्यांनी गावातील वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली आहेत. करूळ होळीचा मांड येथे झाडांना चिरेबंदी पार बांधणे, मंदिर नजीक बैठक व्यवस्था, निर्माल्य कलश चीरेबंदी बांधणे आदी कामे पूर्ण केली आहेत. शिबिरातील विद्यार्थ्यांनी करूळ विद्यालय, खांबाळे व सोनाळी प्रशालेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला के. सी. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सतीश कोलते यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.
सलग तीन वर्ष गावात शिबिर होत आहे. या शिबिरातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. गावच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणाऱ्या के. सी. महाविद्यालयाचे गावच्या वतीने आभार मानण्यात आले.












