कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर
बांदा (प्रतिनिधी) : मडुरा पंचक्रोशीतील गावांमध्ये सध्या वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. वारंवार वीज गायब होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात १ ऑगष्ट रोजी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना प्रकाश वालावलकर, दिनेश नाईक व संदिप परब यांनी दिले आहे.
मडुरा पंचक्रोशीतील बहुतांश गावात वीज नसल्याने वीज बीले भरुनही ग्रामस्थांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. गेली दीड महिने वीज गायब असतानाही अव्वाच्या सव्वा बीले काढली आहेत. वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्याने अनेक वीज समस्या उद्भवल्या आहेत. वीज नसल्यामुळे नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला असून भर पावसाळ्यात पाणीटंचाई संकट उभे ठाकले आहे.
वीज कर्मचारी फोन बंद करुन राहतात. फोनवरुन विसंगत माहिती देतात. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. बीले भरुनही काळोखात रहावे लागत असल्याच्या निषेधार्थ मंगळवार १ जुलै रोजी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे.










