लांजाचे माजी उपनगराध्यक्ष, युवा उद्योजक स्वरूप गुरव यांना उद्यमश्री पुरस्कार जाहीर

संतोष कोत्रे
लांजा -: ‌ लांजा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि स्वरूप ॲक्वा च्या माध्यमातून युवा उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले स्वरूप गुरव यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई च्या वतीने उद्यमश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ लांजा आणि राजापूर अशा दोन्ही तालुक्यात यशस्वीपणे ग्रामीण साहित्य संमेलन भरवत असून या संमेलनाचे निमित्ताने दोन्ही तालुक्यातील सामाजिक,राजकीय, उद्योग व अन्य विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरव केला जातो. याच अनुषंगाने सन २०२६ या आर्थिक वर्षाचा उद्यमश्री पुरस्कार हा लांजा येथील स्वरूप गुरव यांना जाहीर करण्यात आला आहे.‌ कोकणातील तरुणांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पुढे यावे आणि या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याबरोबरच इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी हा या पुरस्कार देण्यामागचा संस्थेचा उद्देश आहे.
लांजा येथील स्वरूप गुरव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमीच सहभागी असतात. लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवले आहेत.‌ त्यांनी स्वरूप ॲक्वा च्या माध्यमातून लांजा शहर व तालुका वासियांना थंडगार आणि स्वच्छ पाणी पुरवण्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.‌ स्वरूप ॲक्वा च्या माध्यमातून त्यांनी काही तरुणांना रोजगार देखील दिला आहे.
स्वरूप गुरव यांच्या या एकूणच कामगिरीची दखल घेत राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्यमश्री पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.‌ दिनांक १ फेब्रुवारी रोजी रिंगणे येथे होणाऱ्या साहित्य संमेलना दरम्यान या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
दरम्यान या पुरस्काराबद्दल स्वरूप गुरव यांच्यावर यांचा शहरासह तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.