पुणे महापालिका निवडणूक : 15 जानेवारीला मतदान, प्रशासनाची जय्यत तयारी

4,011 मतदान केंद्रांवर मतदान; 26 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू वाटपावर करडी नजर

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शहरातील 41 प्रभागांमध्ये एकूण 4,011 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रचार 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेटवस्तू वाटपावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, यासाठी महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील 41 प्रभागांमध्ये पसरलेल्या 4,011 मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

दिवटे यांनी सांगितले की, 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता निवडणूक प्रचार संपेल. 14 जानेवारीला मकर संक्रांती असल्याने उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून नागरिकांना भेटवस्तू किंवा साहित्य वाटप होऊ नये यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात सर्व पक्ष व उमेदवारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाने वेब-आधारित ॲप सुरू केले असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्र शोधता येणार आहे. या ॲपची लिंक पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मतदार स्लिपचे वितरणही नागरी प्रशासनाकडून केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीएमसीच्या मतदार यादीत 35.51 लाख मतदार नोंदणीकृत आहेत. 41 प्रभागांमधून 1,155 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सिंहगड रोड परिसरातील सनसिटी–माणिकबाग प्रभागातून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

निवडणूक प्रक्रियेसाठी 26,000 हून अधिक कर्मचारी तैनात असतील, तर 4,100 पोलिस कर्मचारी मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी असणार आहेत. मतदानासाठी 14,500 पेक्षा अधिक बॅलेट युनिट्स उपलब्ध करण्यात आली आहेत. 4,011 मतदान केंद्रांपैकी 906 मतदान केंद्रे ‘संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आली असून, या केंद्रांवर विशेष नजर ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.