बिजघर नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव भोसले यांच्याकडून स्पोर्ट्स किट्सचे वाटप

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बिजघर नं. १ शाळेतील क्रीडा गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव दिनकरराव भोसले यांनी आपल्या वडिलांच्या, स्वर्गीय दिनकरराव नारायणराव भोसले यांच्या स्मरणार्थ, तालुकास्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट्सचे वाटप केले. हा उपक्रम विश्वासराव भोसले यांच्या फार्महाऊसवर अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विश्वासराव भोसले यांचे मोठे बंधू सदाशिव भोसले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रीडा साहित्य वाटपातून ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रशंसनीय हेतू उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केला.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी सदाशिव भोसले, निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी नारायणराव भोसले, निवृत्त नेव्ही अधिकारी राजेंद्र भोसले, राम रघुनाथराव भोसले, राजेंद्र वामन भोसले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे खेड तालुकाध्यक्ष विजय येरुणकर, बिजघर सरपंच शुभांगी भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन राजारामराव भोसले, संजय सदाशिव भोसले, कमलेश भोसले, दशरथ भोसले, गुलाब भोसले, अनाजी भोसले, वैशाली भोसले, राजश्री भोसले, प्रेमा भोसले, सुप्रिया भोसले, सुप्रिया चव्हाण, सोनाली भोसले तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांनी स्पोर्ट्स किट्समुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून त्यांना तालुकास्तरावर चांगल्या कामगिरीची संधी मिळेल, असे सांगून विश्वासराव भोसले यांचे आभार मानले. शिक्षक विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगितले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा व पुढील वाटचालीत त्यांना बळ मिळावे, यासाठी भोसले कुटुंबियांनी घेतलेला हा पुढाकार उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. या उपक्रमामुळे बिजघर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाबाबत नवचैतन्य संचारले आहे.