फोंडाघाट : कुमार नाडकर्णी — फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. महादेव नारिंगकर यांनी सांगितले की, १० जानेवारी हा दिवस हिंदी भाषेच्या गौरवाचा, संघर्षाचा आणि तिच्या वैश्विक ओळखीचा साक्षीदार आहे. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार व सांस्कृतिक एकतेला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वाचा दिवस आहे.ते पुढे म्हणाले की, १० जानेवारी १९७५ रोजी नागपूर येथे पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. “वसुधैव कुटुंबकम” हे त्या संमेलनाचे बोधवाक्य असून ते भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविते . आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषा अधिक सशक्त करणे तसेच हिंदीविषयीचा गौरव व जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगत शैक्षणिक व सामाजिक जीवनात हिंदीचा प्रभावी वापर करण्याचे सांगितले. हिंदी ही केवळ राष्ट्रभाषाच नसून ती मानवता आणि एकतेचे प्रतीक असल्याचे सांगून हिंदी साहित्यात उपन्यास, नाटक, कवितासंग्रह इ. साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी ते वाचनात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनी केले, तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












