मिनी विधानसभेचे बिगुल वाजले! 

सिंधुदुर्गसह राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

७ फेब्रुवारीला होणार मतमोजणी : आचारसंहिता लागू

सिंधुदुर्ग | विशेष प्रतिनिधी :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली असून, राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे. या घोषणेमुळे आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकांचा टप्पा पुढीलप्रमाणे असेल.

मतदान दिनांक : ५ फेब्रुवारी २०२६

मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६

मतदार यादी : १ जुलै २०२५ रोजीची अद्ययावत मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

दोन मते द्यावी लागणार

या निवडणुकीत मतदारांना दोन मते नोंदवावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषद उमेदवारासाठी, तर दुसरे मत पंचायत समिती उमेदवारासाठी असेल. या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार असून राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

कोकणावर सर्वांचे लक्ष

कोकणातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने राज्याचे लक्ष या पट्ट्याकडे लागले आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण

निवडणूक जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी योजनांच्या जाहिराती, बॅनर हटवण्याचे काम सुरू झाले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानासाठी जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक आयोगामार्फत करण्यात आले आहे.