साटेली-भेडशी येथे शासकीय भात खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ
दोडामार्ग: सुहास देसाई :दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी असून, साटेली-भेडशी येथील मे. श्री विजयादुर्गा ॲग्रो सर्विस येथे शासकीय भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. साटेली-भेडशीच्या सरपंच सौ. छाया धर्णे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.
यावेळी केंद्रप्रमुख भिकाजी गणपत्ये यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रसंगी तेरवण-मेढे उपसरपंच मायकल लोबो, साटेली-भेडशीचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र (संतोष) भिसे, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, बोडदेचे माजी सरपंच फटी नार्वेकर यांच्यासह शिवराम देसाई (केर), हरिश्चंद्र जाधव (खानयाळे), एकनाथ सावंत (आयनोडे), निळू धर्णे, सतीश मयेकर, नारायण धर्णे, ओंकार ठाकूर देसाई, मंदार गणपत्ये व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मिळणार २३६९ रुपये प्रतिक्विंटल दर
मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख भिकाजी गणपत्ये म्हणाले की, “२०१३ पासून या ठिकाणी शासकीय केंद्र यशस्वीपणे सुरू आहे. यावर्षी शासनाने भाताला २३६९ रुपये प्रतिक्विंटल असा चांगला दर निश्चित केला आहे. हे केंद्र ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.”असे आवाहन केले आहे
शासकीय दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
ई-पीक नोंदणी (सप्टेंबरअखेरपर्यंत केलेली असावी).
फार्मर आयडी (Farmer ID).
आधार कार्ड व मोबाईल लिंक असणे अनिवार्य असणार आहे
दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हास्तरावरील बैठकीमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी संदेशाद्वारे आवाहन केले की, तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले भात शासकीय केंद्रावर जमा करून हक्काचा व चांगला दर मिळवावा.यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आहे













