दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रतीक्षा विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका

तीन सुवर्ण,, दोन रौप्य, तीन कांस्यपदकांसह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

संतोष कोत्रे
लांजा -: चिपळूण येथे पार पडलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्यातील विलवडे येथील प्रतीक्षा विशेष शाळेचा विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग सक्षम सक्षमीकरण विभाग रत्नागिरी यांच्यामार्फत या जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा नुकत्याच चिपळूण सावर्डा येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती सुनिता शिरभाते आणि समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांग कर्णबधिर प्रवर्गातील शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील प्रतीक्षा विशेष शाळा विलवडे च्या आठ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सहा मुलांनी तीन सुवर्णपदके, दोन रौप्य पदके आणि तीन कांस्य पदके पटकावली.‌ तसेच मुलींच्या रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या इतिहासात शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शाळेचे संचालक फादर आगस्टीन, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर धन्या, शाळेचे शिक्षक सौ प्रीती सरफरे श्रीमती प्रतिक्षा मोहिते, अनिरुद्ध चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी ब्रदर मॅथ्यू, यांच्या प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे यश संपादन केले आहे. याबद्दल सर्व विद्यार्थी शिक्षकांचे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.