नरेंद्र मोहिते, राजापूर
कधी जाहिर होणार.. कधी जाहिर होणार.. याची प्रतिक्षा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमाची घोषणा मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. जिल्हयात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी तर जिल्हयातील नऊ पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी जिल्हयात ही निवडणूक होणार असून यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीची घोषणा होताच व आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकिय पक्षांनी व त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी हाती घेतली असून इच्छुकांची तिकिट मिळविण्यासाठी लगबग व लॉबिंग सुरू झाले आहे.
या निवडणूकीच्या प्रचारासाठी असलेला कमी कालावधी, इच्छुकांची वाढती संख्या याचा विचार करता राजकिय पक्षांसह उमेवारांची मतदारांपर्यंत पोहचता चांगलीच दमछाक होणार आहे. मात्र तालुक्यात महायुती विरूध्द महाविकास आघाडी असाच सामना रंगण्याची शक्यता असून युती व महाविकास आघाडी होणार का?यावरही अनेक इच्छुकांचे तिकिटाचे भवितव्य अवलंबून आहे.
राजापूर तालुक्यात नव्या नावाने अस्तीत्वात आलेले जिल्हा परिषदेचे सहा गट व त्यातील पंचायत समितीचे बारा गणांमध्ये या निवडणूका होणार आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये जि. प. व पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यानंतर सन २०२२ मध्ये या निवडणूका होणे अपेक्षित होते. मात्र आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या निवडणूका पुढे गेल्या व गेली तीन वर्षे जि. प. व पं. स. वरही प्रशासकिय राजवट जारी होती. आता या निवडणूकांची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ही प्रशासकिय राजवट संपुष्टात येऊन खऱ्याह अर्थाने लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे.
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी होणाऱ्या या निवडणूकीची लगबग आता सुरू झाली आहे. शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार या गट व गणांची नावे बदलण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात नव्या नावने अस्तीत्वात आलेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये धोपेश्वर, वडदहसोळ, साखरीनाटे, तळवडे, जुवाठी, कातळी असे सहा जिल्हा परिषद गट असून या सहा जिल्हा परिषद गटांमध्ये बारा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये धोपेश्वर जि. प. गटात धोपेश्वर व पेंडखळे, वडदहसोळ जि. प. गटामध्ये वडदहसोळ व रायपाटण, साखरीनाटे जि. प. गटात साखरीनाटे व नाटे, तळवडे जि. प. गटात तळवडे व ताम्हाणे, जुवाठी जि. प. गटात जुवाठी व केळवली तर कातळी जि. प. गटात कातळी व अणसुरे या बारा गणांचा समावेश आहे.
यातील धोपेश्वर, वडदहसोळ पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तर, साखरीनाटे, तळवडे पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित झाला आहे. जुवाठी गण आणि गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आहे.
रायपाटण, पेंडखळे पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तर कातळी पंचायत समिती गण सर्वसाधारण व कातळी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे.
या आरक्षित गट व गणांमध्ये यापुर्वी इच्छुक असलेल्या अनेकांच्या आशाआकांक्षावर आरक्षणामुळे पाणी फेरले आहे. तर काहींना सेफ गट व गण झाल्याने उमेदवारीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. तर काही ठिकाणी राजकिय पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. आता निवडणूक जाहिर झाल्यानंतंर सर्वच राजकिय पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. आपल्यालाच त्या गट व गणातुन तिकिट मिळावे यासाठी इच्छुकांकडून सध्या वेगवेगळया पध्दतीने फिल्डींग लावली जात आहे. राजापूर तालुका पंचायत समितीचे सभापती पद हे महिला राखीव झालेले आहे त्यामुळे या पदासाठी इच्छुक असणाऱ्या महिला उमेदवारांनीही तिकिटासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
राजापुरात नगर परिषद निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी हे युत्या व आघाडी करून लढले होते. त्याची परिणीती निकालांती दिसून आली आहे. आता या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी होणार की सर्व जण स्वतंत्र लढणार याचीही उत्सुकता आहे. सर्वच राजकिय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे व बंडखोरी टाळण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे एवढे मात्र नक्की.












