जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक धुमाळीत काँग्रेसला धक्का
राजापूर प्रतिनिधी :राजापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या आपल्या राजीनामा पत्रात जितेंद्र खामकर यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव पक्ष सदस्यत्व आणि तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. खामकर यांच्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान खामकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा असून लवकरच त्यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे माहितीही पुढे आली आहे.
राजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक स्थिती फारशी बरी नव्हती. त्या काळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जितेंद्र खामकर यांनी पक्ष संघटन वाढीसाठी काम केले होते.त्याची दखल घेऊन त्यांची काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. नुकत्याच झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास म्हणून काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले होते व न. प. मध्ये सत्ता आली होती. त्यामुळे आघाडीत उत्साहाचे वातावरण होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक जाहिर झालेली असतानाच खामकर यांनी आपल्या सदस्यत्व पदासह तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिलेली संधी आणि नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.राजापूर तालुक्यातील जेष्ठ पक्ष सदस्य, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी यांनी दिलेली साथ याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान गुरूवारी खामकर यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत नुतन नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे सत्कारही करण्यात आले. या बैठकीत आयत्यावेळच्या चर्चेत आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा खामकर यांनी केली. यावेळी अनेकांनी त्यांनी राजीनामा मागे घ्यावा असा आग्रह धरला. मात्र खामकर यांनी त्यास नकार दिला.











