दापोली प्रतिनिधी: दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शुक्रवार दिनांक १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
जि.प., पं. स. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेण्यास प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण १८ तर पंचायत समितीसाठी १० अर्जाची विक्री झालेली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक जाहीर होताच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.












