नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या रुपाने लांजा गावच्या मानकरी घराण्यांंचा सन्मान मानकरी, गावकरी यांच्यातून समाधानाचे वातावरण

संतोष कोत्रे
लांजा -: नुकत्याच झालेल्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदी सौ. सावली सुनील कुरूप आणि उपनगराध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची निवड झालेली आहे.‌. विशेष बाब म्हणजे नगरपंचायतीच्या दोन्ही महत्त्वाच्या आणि सर्वोच्च पदावर विराजमान झालेले हे दोन्ही पदाधिकारी लांजा गावच्या मानकरी घराण्यातील असल्याने सर्व मानकरी बांधवांमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लांजा गावचे रूपांतर शहरात होत असले तरी आजही लांजा गावचे एक वेगळे वैशिष्ट्य असून येथील प्रथा परंपरा, मानकरी‌ यांना आजही तितकाच मानसन्मान आहे.‌ याच परंपरेला साजेसा सन्मान सावली कुरूप आणि बाबा लांजेकर यांच्या निवडीमुळे मिळाल्याची भावना लांजावासीयांतन व्यक्त होत आहे
नगराध्यक्षपदी निवड झालेल्या सावली कुरूप या शांत व संयमी नेतृत्व असून उपनगराध्यक्षपदी निवड झालेले बाबा लांजेकर हे कार्यतत्पर आणि अनुभव संपन्न व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. दस्तूरखुद्द आमदार किरण सामंत यांनीही उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे.‌ त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून लांजा शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच दिशा मिळेल अशी अपेक्षा देखील आता नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी मानकरी घराण्यांंवर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लागेल आणि लांजा शहराच्या प्रगतीचा आलेख उंचावेल असा विश्वास नागरिक तसेच येथील उद्योजक विकास शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.