प्रशालेच्या २५ विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्णपदक
आंबोली । प्रतिनिधी : दि सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान, गणित आणि इंग्रजी ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांवर मोहोर उमटवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेच्या विविध इयत्तांमधील एकूण २५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.
विज्ञान ऑलिंपियाड स्पर्धेत इयत्ता सहावीतील कॅडेट अथर्व मोहिते, तर इयत्ता सातवीतील कॅडेट महादेव जाधव, कॅडेट शेवन परेरा आणि कॅडेट स्वराज पारकर यांनी सुवर्णपदक मिळवले. गणित ऑलिंपियाडमध्ये इयत्ता सहावीतून कॅडेट अथर्व मोहिते, कॅडेट वेद बेळणेकर, कार्तिक साइल; इयत्ता सातवीतून मधुस्पर्श कदम, सर्वेश गावडे, स्वराज पारकर; इयत्ता आठवीतून कॅडेट द्विज खानोलकर, यज्ञेश डेगवेकर तर इयत्ता नववीतून श्रीदत्त मेंगडे, ओम निकम आणि रुद्र शेट्ये यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. यातील कॅडेट श्रीदत्त मेंगडे याची दुसऱ्या स्तरासाठी (Level 2) निवड झाली आहे.
इंग्रजी ऑलिंपियाडमध्ये इयत्ता सहावीतील कॅडेट अथर्व राठोड, अथर्व मोहिते, वेद बेळणेकर; इयत्ता सातवीतून तनुष राऊत, सर्वेश गावडे; इयत्ता आठवीतून चैतन्य पवार, तनिष्क मोरे, आरुष कोरगावकर आणि इयत्ता नववीतून दुर्वेश बागवे, मिहिर सावंत, दक्ष शेडगे यांनी सुवर्णपदक पटकावले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सैनिक स्कूलच्या तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, सर्व संचालक आणि पालकांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










