चिपळूणात शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून जि. प., पं. स. निवडणुका लढवणार

जागावाटप देखील निश्चित
शिवसेना जि. प. च्या ६ तर भाजपा ३, पं. स. च्या ११ शिवसेना तर ७ जागा भाजपा लढणार
शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांची माहिती

चिपळूण (प्रतिनिधी):- चिपळूण नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठी शिवसेना भाजप युती झाली असून जागा वाटप निश्चित देखील झाले आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटातील शिवसेना सहा जागांवर तर भाजप ३ जागांवर तसेच १८ पंचायत समिती गणातील शिवसेना ११ जागांवर तर भाजप ७ जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली. चिपळूण नगर परिषदेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील शिवसेना-भाजप युतीला भक्कम यश मिळेल, असा विश्वास देखील सदानंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे चिपळूण तालुका समन्वयक दिलीप चव्हाण उपस्थित होते. यावेळी सदानंद चव्हाण पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र ना. फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत असलेली विकास कामे, लाडकी बहीण योजना तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून युतीची कामे जनतेपर्यंत पोहोचली आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये युतीला चांगले यश मिळाले आहे. याचा फायदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये होईल असा विश्वास देखील माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

ते आणखी पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत येण्याची हाक मारली होती. या हाकेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे या निवडणुकीत नक्कीच आणखी फायदा होईल. यामध्ये माजी सभापती सौ. धनश्री शिंदे येणे शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार त्या आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करतील असे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत आणि युतीला भरघोस यश मिळेल, असा विश्वास देखील माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला.