अखेरच्या दिवशी जि.प.साठी 7 तर पं.स. साठी 10 उमेदवारी अर्ज दाखल
गुहागर प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुहागरमध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर पंचायत समितीसाठी एकूण 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी आता एकूण 16 तर पंचायत समितीसाठी एकूण 29 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
सुरुवातीला या ठिकाणी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होती. मात्र मंगळवार व बुधवार या दोन दिवसात अधिकाधिक उमेदवारांनी व विविध पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या असगोली जिल्हा परिषद गटातून ऐन निवडणुकीत भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आम. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यासमोर आता युतीकडून संतोष जैतापकर यांना उतरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर याच गटातून बळीरासेनेकडून अरुण भुवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून फरहान चोगले, शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून आतिश हातीसकर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून आसावरी बाधावटे, पडवे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून तुकाराम निवाते तर अपक्ष म्हणून मंदार रहाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर बुधवारी पंचायत समिती साठी दाखल झालेल्या 10 उमेदवारी अर्जामध्ये अंजनवेल पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून सारिका दाभोळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भक्ती बने, असगोली पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून श्रावणी शिंदे,तळवली पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून संतोष जोशी,काँग्रेसकडून रियाज ठाकूर,बसपाकडून सखाराम पवार तर अपक्ष म्हणून महेश शिगवण,पडवे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून वसंत किल्लेकर ,पाचेरीसडा पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून सुप्रिया घाणेकर, व रेणुका आग्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र दिनांक 27 रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी अंतिम किती उमेदवार रिंगणात राहतात व कोण माघार घेते हे निश्चित होणार आहे. सध्या याठिकाणी जिल्हा परिषदेसाठी एकूण 16 तर पंचायत समितीकरिता एकूण 29 उमेदवार रिंगणात आहेत.











