पोलिसांनी २४ तासात लावला खुनाचा छडा, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुर्णे येथील संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या सुरेश रामचंद्र पडये या ४५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताना या खुनाच्या घटनेचा २४ तासात उलगडा करत संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुर्णे, पडयेवाडी येथील सुरेश रामचंद्र पड्ये (वय ४५, ) हे आपल्या घरी एकटेच राहत होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सुरेश यांच्या मुंबई येथे असलेल्या मुलीने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सोमवारी रात्री चुलत काका शाम पड्ये यांना फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले होते. त्यानुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शाम पड्ये हे सुरेश यांच्या घरी गेले असता घरातच त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना व लांजा पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. त्यानंतर २० जानेवारी रोजी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र सुरेश पडये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने आणि त्यांच्या हातावर जखमा आढळल्याने पोलीसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू होता. अशातच फिर्यादी शाम लक्ष्मण पडते (वय ४५, रा.कुर्णे, पडयेवाडी, ) यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुरेश पडये व कुर्णे, सुतारवाडी येथील नंदकुमार पांचाळ (वय २५) हे दोघे एकत्र फिरत असायचे, एकत्रित मजुरीचे काम करायचे आणि एकत्र दारूही प्यायचे. नंदकुमार पांचाळ हा सुरेश पडये यांच्या घरात दारू पिऊन भांडणे देखील करत होता.
त्यांच्या फिर्यादीनुसार लांजा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुर्णे येथीलच नंदकुमार रविंद्र पांचाळ याला ताब्यात घेतले आहे. सुरेश पडये आणि नंदकुमार पांचाळ यांच्यात दारू पिऊन भांडण झाले होते आणि नंदकुमार पांचाळ याने सुरेश पडये यांच्या डाव्या हाताचे मनगटावर मारून गंभीर दुखापत केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सुरेश पडये याचा मृत्यू झाला असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली होती.
या खुनाच्या घटने प्रकरणी पोलिसांनी नंदकुमार पांचाळ याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.












