वाहनांचा पाठलाग, लहान मुलांवर हल्ले; विद्यार्थी-महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण
नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प; नसबंदी मोहीम केवळ कागदावरच?
तात्काळ बंदोबस्त करण्याची सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शमिना परकार यांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हे श्वान घोळक्याने रस्त्याच्या मध्यभागी उभे राहणे, दुचाकी-चारचाकी वाहनांचा पाठलाग करणे आणि पादचाऱ्यांवर हल्ला करणे अशा घटनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शमिना परकार यांनी चिपळूण नगरपरिषदेकडे याबाबत तक्रारवजा निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात डॉ. शामिना परकार यांनी म्हटले आहे की, चिपळूण शहरातील गोवळकोट मार्गावर तर या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. विद्यार्थी शाळेत जायच्या वेळेत मोकाट श्वानाने लहान मुलांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत जायला घाबरत असल्याचे पालकांनी आपल्याला सांगितले. शहरातील गोवळकोट रस्ता तसेच मच्छीमार्केट, भाजी मंडई, जुना बसस्थानक परिसर, शाळा-कॉलेज परिसर आणि चौका-चौकांमध्ये १० ते १५ श्वानांचा घोळका एकत्र उभा असल्याचे चित्र रोजच पहावयास मिळत आहे. रात्रीच्या वेळेस कामावरून घरी जाणाऱ्या महिला, नागरिकांना या घोळक्यामुळे जीव मुठीत धरून जावे लागत आहे. श्वान अचानक रस्त्याच्या मधोमध धावत येतात, दुचाकीचा पाठलाग करतात. त्यामुळे घाबरून अनेक दुचाकीस्वार तोल जाऊन पडत आहेत. चारचाकी चालकांनाही अचानक ब्रेक लावावा लागतो. पादचाऱ्यांना तर रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून श्वान नसबंदी मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ती मोहीम केवळ कागदावरच आहे का, असा सवाल डॉ. परकार यांनी उपस्थित केला आहे. आम्ही श्वान पकडायला गेलो की काही प्राणीप्रेमी त्यांना पकडू देत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी हतबल होतात. पण याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. नसबंदी झाली असती तर इतकी संख्या वाढलीच नसती असे त्यांनी सांगितले. अनेकवेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही चिपळूण नगरपरिषद प्रशासन मूग गिळून बसले असल्याने डॉ. परकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मोकाट श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करावा, त्यांची नसबंदी करून त्यांना शहराबाहेर योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे. अन्यथा भविष्यात विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना चावा घेऊन किंवा अपघात होऊन काही बरे-वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार चिपळूण नगरपरिषद राहील, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शमिना परकार यांनी दिला आहे. या प्रश्नावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.













