सावंतवाडीत २३ जानेवारीला सी.एस्.डी. कॅन्टीन सेवेचा शुभारंभ
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांसाठी नवी सेवा सुरु होत आहे. १०९ इन्फट्री बटालियन (टी.ए.) मराठा लाईट इन्फट्री कोल्हापूर यांच्याकडून जिल्ह्यासाठी सी.एस्.डी. कॅन्टीन सेवा (विस्तार कक्ष) मंजूर करण्यात आली आहे. या सेवेचा रीतसर शुभारंभ शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता कोलगाव येथे होणार आहे.
कोलगाव येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग शाखा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. जिल्ह्यातील सैनिकांना कॅन्टीन सुविधेसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, या उद्देशाने हा विस्तार कक्ष सुरू करण्यात येत आहे.
तरी या सर्व आजी-माजी सैनिकांनी उद्घाटनाला उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन १०९ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) एम.एल.आय. कोल्हापूरचे कॅन्टीन ऑफिसर आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग (सिंधुदुर्ग डिस्ट्रिक सेंटर) चे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी केले आहे.














