मुख्याधिकारी विशाल भोसले यांचा भावनिक निरोप
चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली असून गुरुवारी त्यांनी नगर पालिकेतून आपल्या सहकाऱ्यांचा भावनिक निरोप घेतला. “चिपळूणने मला खूप प्रेम दिले. सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी चांगले काम करू शकलो,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नगर पालिकेतून बाहेर पडताना १८७७ साली स्थापन झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायऱ्यांवर ते नतमस्तक झाले. नगर परिषद इमारतीला त्यांनी नमस्कार केला आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आपल्या सेवाकाळातील आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला.
प्रशासक म्हणून कार्यरत असताना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले. प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष मोहीम, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ‘वाचवा आनंदाने’ उपक्रम, प्रदूषणमुक्ती व इंधन बचतीसाठी ‘सायकल डे’ यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्यकाळाची वेगळी ओळख निर्माण झाली. आपल्या कामाची ठसा उमटवून गुरुवारी ते रहिमतपूर येथे मुख्याधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी रवाना झाले.
या निरोपप्रसंगी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, सुजित जाधव, बापू साडविलकर, संतोष शिंदे यांच्यासह नगर परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकाऱ्यांनीही सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचा निरोप घेतला.
जड पावलांनी आणि भावनिक मनाने विशाल भोसले चिपळूणहून रहिमतपूरच्या दिशेने रवाना झाले.












