स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची कारवाई
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील संशयीत आरोपी
प्रसाद सुधाकर चव्हाण सध्या रा. मुंबई मूळ रा. मालवण याला सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. दरम्यान मालवण पोलिसांनी
प्रसाद सुधाकर चव्हाण याला मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला 26 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मालवण येथील घरफोडी प्रकरणी मालवण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. 109/2025, BNS 2023 चे कलम 305, 331(3), 331(4) नुसार दिनांक 24 जुलै 2025 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषणावरून तसेच रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न झाला.
सदर गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी प्रसाद सुधाकर चव्हाण, वय 25, मूळ रा. भरड, ता. मालवण. सध्या रा. राजेंद्रनगर, बोरिवली पूर्व, मुंबई यास सिद्धार्थ नगर बोरिवली येथून 22 रोजी शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्याच्या पुढील तपास कामी मालवण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु.नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक अनिल हाडळ, किरण देसाई, विल्सन डिसोझा, आशिष जामदार यांनी केली. सायबर पोलिस ठाण्याचे प्रथमेश गावडे यांनी या कामी तांत्रिक मदत केली. अशी माहिती देण्यात आली.











