चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात १७ वर्ष वयोगटातील मुलींसाठी डेरवण एनर्जीया फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये कर्नाटक, गोवा या राज्यांमधून तसेच मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी अशा जिल्ह्यांमधून एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.
लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाने वर्चस्व नोंदवले. उपांत्य फेरीतील झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (ब) संघाने टी. एफ. ए या संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तसेच उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (अ) व एस ३ सॉकर अॅकॅडमी या संघामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ०-१ अशा फरकाने गोल करून एस ३ सॉकर अॅकॅडमी संघाने अंतिम फेरीत आपले नाव कोरले.
तृतीय क्रमांकासाठी घेण्यात आलेल्या संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (अ) विरुद्ध एस ३ सॉकर अॅकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (अ) संघाने १-० ची आघाडी करून विजय मिळविला व तृतीय पारितोषिक जिंकले.
अंतिम लढतीत संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (ब) विरुद्ध एस ३ सॉकर अॅकॅडमी या संघांमध्ये झालेल्या रोमांचकारी लढतीत संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (ब) हा संघ २ – ० या फरकाने अजिंक्यपदाचा मानकरी ठरला. विजेत्या संघांला रु. ५०,०००/- , उपविजेत्या संघाला रु. ४०,०००/- आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या संघाला रु. २५,०००/- रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक व स्पर्धेतील देऊन गौरविण्यात आले. तसेच संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (ब) संघातील प्राजक्ता वेसारे – उत्कृष्ठ गोलरक्षक आणि संजीवन स्पोर्ट्स अॅकॅडमी (अ) संघातील खेळाडू श्रेया भागवत – गोल्डन बूट चषकाच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेच्या परितोषिक वितरण समारंभाप्रसंगी डॉ. निलम शिरसाट, मॅच कमिशनर राजेंद्र राऊत, संजीवन एज्युकेशन हबचे चेअरमन संजीव भोसले तसेच एसव्हीजेसीटी क्रीडा संयोजन समितीचे अरुण मिराशी, विजय जाधव, प्रशांत सावंत, योगेश विचारे, ज्ञानेश जाधव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व आदि मान्यवर उपस्थित होते.
..
चौकट : पुढील वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या डेरवण एनर्जिया स्पर्धेकरिता आयोजकांच्या वतीने एकूण पाच लाखाची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. यामध्ये विजेत्या संघाला रु. २,५०,०००/-, उपविजेत्या संघाला १,५०,०००/- व तृतीय प्राप्त क्रमांकाला रु. १,००,०००/- रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.












