वार्तापत्र-कोकण संतोष वायंगणकर
कोकणासह महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिका, नगरपंचायत आणि तद्नंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना(शिंदेगट) राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) यांची महायुतीचा बोलबालाही राहिला आणि कोकणात निवडणुकांमध्ये चांगल यश संपादन केलं. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या अभेद्य बालेकिल्ला असल्याच निवडणुक निकालानंतर सिद्धही केलं आहे. पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेगट) कुठेही दिसला नाही. महाविकास आघाडीची एकसंघता तर कुठे दूर-दूर पर्यंत दिसत नाही. उलट कुणाचा पायपोस कुणात नाही अशीच स्थिती आहे. हरलेल्या मनाने निवडणुक असो किंवा लढाई असो ती जिंकता येत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. कार्यकर्ते पक्षासोबत आणि नेत्यासोबत रहाण्यासाठी कार्यकर्त्यांचा विश्वासही संपादन करण्याची गरज असते. काहींना कार्यकर्त्यांना जोडून ठेवण सहज जमतं. त्यामुळेच असे काही यशस्वी राजकारण करताना दिसतात. कोकणात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रायगडमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या ५९, तर पंचायत समिती सदस्य ११८ रत्नागिरीत जिल्हा परिषद सदस्य संख्या ५६, पंचायत समिती सदस्य संख्या ११२ तर सिंधुदुर्गात जिल्हा परिषद सदस्य संख्या ५० तर पंचायत समिती सदस्य संख्या १०० सदस्य संख्या आहे. २७ जानेवारी शेवटची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. आजच्या घडीला कोकणात महायुती जोमात आणि महाविकास आघाडी कोमात अशी स्थिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना (शिंदेगट) आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली आहे. आणि रत्नागिरीत महायुती म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुक लढवली जात आहे. तर सिंधुदुर्गातही भारतीय जनतापार्टी, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीकडून ही निवडणुक लढवली जात आहे. रायगडमध्ये महायुती आहे. परंतु रायगडमध्ये शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट यांच विळ्या-भोपळया इतक सख्य आहे. राज्याच्या सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट आणि शिवसेना शिंदेगट जरी एकत्र असले तरी मात्र कोकणातील रायगड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगट यांच्यामधून विस्तव जात नाही अशी रायगड जिल्ह्याची राजकिय स्थिती असताना भारतीय जनतापक्ष रायगड जिल्ह्यात सावध पवित्रा घेत आपले हात-पाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे रायगडवरचे आपले वर्चस्व कमी होऊ नये याची काळजी घेत वेळो-वेळी रायगड जिल्हा परिषदेत तडजोडी करत रायगड जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखण्यात आजवर यश मिळवले आहे. पूर्वी रायगड जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे शेतकरी कामकरी पक्षाच्या माध्यमातून पाटील घराण्याची सत्ता होती. परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षात खा.सुनिल तटकरे यांच्या राजकीय खेळीने रायगडमधील शेतकरी कामकरी पक्षाची अवस्थाही फार बिकट बनली. विधानपरिषदेत आमदार असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे आधीच शेवटच्या घटका मोजणाऱ्या शेकापची अवस्थाही फारच वाईट बनली आहे. त्यातच रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेनेही बऱ्यापैकी हात-पाय पसरले आहेत. जिल्ह्यात शिवसेना सर्वस्तरात आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पूर्वी आणि आजही रायगड जिल्ह्याच्या राजकारणात काही सूर सापडलेला नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेत आठ वर्षापूर्वी शिवसेना सत्तेवर होती. गेली वीस-पंचवीस वर्षे रत्नागिरीत शिवसेनेचीच सत्ता राहीली आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या सत्तेची गणित उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत राहीली आहेत. रत्नागिरीच्या राजकारणात ‘ वन टू का फोर’ म्हणत राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये राजकारण करायचे तेव्हा किमान रत्नागिरी शहरपरिसरातील राजकारणात काहीही घडण्याची शक्यता होती. परंतु अलिकडे तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि त्यातही सर्वसमावेशक राजकारण करेल असं नेतृत्वच नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उबाठाचे एकमेव आमदार असलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून फार विश्वासातच घेतले जात नाही. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी स्वत:च अस्तित्व राखण्यासाठी फार नियोजनबद्ध पद्धतीने कोकणात उबाठात गटबाजी पोसली आहे असा आरोप नेहमीच गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव करत आले आहेत. आ.भास्कर जाधव यांच्या माजी खा. विनायक राऊत यांच्या आरोपांची मातोश्रीकडून फार गंभिरतेने काही दखल घेतली जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यात तर शिवसेना उबाठातील विनायक राऊत आणि आ.भास्कर जाधव यांच्या वादाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेत संभ्रमावस्था आहे. ठाकरे गटातील हा संघर्ष काही लपून राहीलेला नाही. या सुप्त वाटणाऱ्या संघर्षाने केव्हाचेच उघड स्वरूप कोकणासमोर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली तीस वर्षे माजी केंद्रिय मंत्री खा.नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता राहीली आहे. यावेळच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता राहील. एकूणच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यामध्ये महायुती जिल्हा परिषदेत सत्तेवर येईल अशी आजची स्थिती आहे. कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा, शिवसेना महायुतीत जिल्हा परिषद, पंचायत समितीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. तर महाविकास आघाडीत उमेदवारच सापडत नाही असं विदारक परंतु वास्तव चित्र कोकणच्या राजकारणात आहे.












