खेड (प्रतिनिधी) – माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेशमंदिरात श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करून भक्तीमय वातावरण निर्माण केले. गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी हा धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
चौदा विद्या व चौसष्ट कलेचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्ता श्री गणरायाच्या उत्सवानिमित्त दरवर्षी जपली जाणारी अथर्वशीर्ष पठणाची परंपरा यंदाही रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली. शाळेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी अचूक शब्दोच्चार, सुरेल आवाज आणि लयबद्ध पठणाच्या माध्यमातून श्री गणपती अथर्वशीर्ष सादर केले. पठणातील चढउतार आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे उपस्थित भाविक अथर्वशीर्ष श्रवणात तल्लीन झाले होते.
रोटरी स्कूलच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय सुस्पष्ट आणि भक्तिभावाने अथर्वशीर्ष पठण केल्याने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. भविष्यातही अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, शाळेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच शिक्षकवृंद यांनी अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.












