रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी पोलिस दलामार्फत प्रजासत्ताक दिन 2026च्या निमित्ताने उत्तर-पूर्व भारतातील नागालँड व मणीपूर या राज्यांमधून शिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे वास्तव्यास असलेल्या 19 विद्यार्थ्यांसाठी “विशेष संपर्क” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी त्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच पोलिस विभागांची व पोलिस विभागामार्फत राबवण्यात येत असलेले विविध मिशन,प्रोजेक्ट,डिजिटल ॲप्लिकेशनबाबत सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर-पूर्व भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण,नोकरी व करिअरच्या संधीसाठी आपल्या कुटुंबापासून व मुळ गावापासून दूर वास्तव्यास आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपुलकीची भावना देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे व त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे या उद्देशाने 26 जानेवारी रोजी पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित ध्वजारोहण समारंभासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विशेष संवादातून या विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याची व कोणत्याही अडचणीच्या वेळी निर्धास्तपणे पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध भाषा,संस्कृती व प्रांत असूनही आपण सर्व भारतीय आहोत, हा एकतेचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी पोलिस दल भविष्यातही अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम राबवून सर्व घटकांशी संवाद वाढविण्यास कटिबध्द आहे.











