‘महाराष्ट्राने एक निर्भीड आणि कणखर लोकनेता गमावला’; खा. नारायण राणे 

मुंबई :

“माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते,” अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

नारायण राणे पुढे म्हणाले की, सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही सामान्य माणसाच्या वेदनांशी नातं जपणारा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मागे न हटणारा असा खंबीर कणखर नेता महाराष्ट्राने आज गमावला आहे. त्यांची कार्यशैली, स्पष्ट भूमिका आणि जबाबदारीची जाणीव ही पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता.

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना,” असे म्हणत खासदार राणे यांनी आपल्या सहकारी मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.