मसुरे | झुंजार पेडणेकर
टायर फुटल्याने नादुरुस्त बनलेल्या डंपरला पाठीमागच्या बाजूने मोटारसायकलने धडक दिल्याने गोळवण येथील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजता घडली.
बेळणे मालवण मुख्य मार्गावरील मसदे गावडेवाडी येथे झालेल्या या अपघातात गोळवण समतानगर येथील समीर पवार (40 वर्ष ), राजन जाधव (35 वर्ष ) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की हिवाळे येथून खाडी वाहतूक करणारा डंपर (एम एच 07 सी 6828) हा मंगळवारी सायंकाळी मालवण येथे जात असताना मसदे परिसरात डंपरचे मागील टायर फुटूल्याने डंपर अर्धा रस्त्यात उभा होता. याच दरम्यान रात्री 9 वा च्या दरम्याने चिरेखाणीवर काम करणारे गोळवण समतानगर येथील समीर पवार, राजन जाधव हे मोटार सायकलने विरण येथून गोळवण येथे जात असता रस्त्यावर उभा असलेल्या डंपर त्यांना न दिसल्याने त्यांची मोटरसायकल डंपर चालकाच्या मागच्या बाजूला जोरदार धडकली. यावेळी दोन्ही तरुणांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने तरुणांच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाला होता. अपघाताचा आवाज ऐकून शेजारी राहणारे गॅरेज व्यावसायिक अजिंक्य मसदेकर व इतरांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अपघाताची माहिती विरण येथे समजताच माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सरपंच दत्ताराम आंबेरकर, पोलिस पाटील निनाद माड्ये, विलास पांजरी, जयवंत पांजरी, कमलेश प्रभू, व इतरांनी अपघात स्थळी येऊन गंभीर जखमी तरुणांना रुग्णवाहिका आणून गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डोक्याला जास्त प्रमाणात मार लागल्यामुळे त्यांना रात्री जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, भाऊ चव्हाण, विकास पवार, नचिकेत पवार, प्रभारी सरपंच शरद मांजरेकर, माजी सरपंच सुभाष लाड, व इतरांनी उपचारासाठी तरुणांना सहकार्य केले. मात्र मंगळवार सायंकाळ पासून नादुरुस्त डंपर रस्त्यावरच राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे . याबाबत या मार्गावरील वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.










