फोंडाघाट महाविद्यालयात आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.!
फोंडाघाट :कुमार नाडकर्णी — येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या वतीने आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मानसिक बळ व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. जगदीश राणे यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण वातावरणात शारीरिक बळापेक्षा मानसिक दृष्ट्या सक्षम असणे अधिक गरजेचे आहे. आत्मविश्वासाने प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे गेल्यास त्यावर निश्चितपणे मात करता येते.” आत्मसंरक्षणासाठी केवळ तंत्र शिकणे पुरेसे नसून जागरूकता, प्रसंगावधान आणि आत्मनिर्भरता विकसित होणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्याच्या सोशल मीडियाच्या प्रभावी काळात सायबर गुन्हे, चुकीची माहिती व मानसिक ताण यापासून स्वतःचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा व कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, “आज मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित आपत्तींचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.” आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक उपचार, आपत्कालीन निर्णयक्षमता यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच उपयोगी पडेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावा व गरजूंना प्रशिक्षित करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. आत्मसंरक्षण ही केवळ स्वतःची सुरक्षितता नसून सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी करून शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार प्रा. विनोदसिंह पाटील यांनी मानले. या शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












