गवाणे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गवाणे शाळा नं.१ ची विद्यार्थिनी म्हाळसा राकेश दळवी हिने कवितालेखन स्पर्धेत पृथ्वीराज चौहान या विषयावर सादर केलेल्या लेखनाला शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वीर गाथा ५.० हा प्रकल्प राबविण्यात आला. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाद्वारे शाळांतील विद्यार्थ्यांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमिडिया) प्रकल्प सादर करता येतात. सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.
वीर गाथा प्रकल्प ५.० विद्यार्थी शौर्य पुरस्कारासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे नं.१ शाळेची इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी म्हाळसा राकेश दळवी हिने पृथ्वीराज चौहान या विषयावर कवितालेखन स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळविले. त्याबद्दल तिला शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर नियुक्त केलेल्या मूल्यमापन समितीने निवडक सर्वोत्तम विजेत्यांना दि.२६ जानेवारी रोजी त्यांच्या पालकांसोबत विशेष अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रनागिरी या ठिकाणी आमंत्रित करून प्राचार्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याबद्दल म्हाळसाचे, तिच्या आई वडिलांचे तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. मृगया मोरे, वर्गशिक्षिका सौ. शैला पराडकर, मंगेश मोरे, मुख्याध्यापक निंगाप्पा कुंभार यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.













