सुटीच्या काळात घर बंद असणे पडले महागात; रत्नागिरीत ६ लाखांची चोरी.

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील सन्मित्र नगर येथील घर फोडून अज्ञाताने तब्बल 6 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. घरफोडीची ही घटना सोमवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वा.कालावधीत घडली आहे.

याबाबत तेजस मोरेश्वर नगराळे (33,मुळ रा.सुतेज सन्मित्रनगर,रत्नागिरी सध्या रा.नवी मुंबई) यांनी गुरुवार 29 जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,26 जानेवारी रोजी अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावण्यात आलेले कुलुप कडी-कोयंड्यासह उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख 7 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या,सोन्याचा लांब हार,सोन्याची कर्णफूले,सोन्याच्या कानातील साखळ्या,सोन्याचे कानातील चौकोनी आकाराचे दोन टॉप जोड, सोन्याच्या दोन अंगठ्या,सोन्याच्या दोन नथ,सोन्याचे चार मणी,चांदीचे पैंजण,चांदीचे नाणे आणि रोख 4 हजार रुपये या मुद्देमालाचा समावेश होता.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.