जुवाठी पं. स. गणातील जनतेच्या आग्रहासाठी निवडणूकीच्या मैदानात- प्रकाश भिवंदे

जनता आपल्या पाठीशी त्यामुळे आपला विजय निश्चित
राजापूर (वार्ताहर): गेली २५ वर्षे आपण सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करत आहोत. आपल्या परिने मी माझ्या जुवाठी पंचक्रोशीच नाही तर भागातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस पंचायत समितीत असावा अशी आग्रही मागणी या भागातील जनतेची असून माझ्या भागातील जनतेच्या आग्रहाखातर मी या जुवाठी पंचायत समिती गणातुन अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. संपुर्ण गणातील जनता आपल्या पाठीशी असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा जुवाठी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार प्रकाश भिवंदे यांनी केला आहे.
भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते व एक यशस्वी व्यावसायिक अशी ओळख असलेले प्रकाश भिवंदे हे जुवाठी पंचायत समिती गणातुन अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षाकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली होती, मात्र महायुतीत हा गण शिवसेनेच्या वाटयाला गेल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र या भागातील जनतेचा आग्रह व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ यामुळे ते या गणातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
एक अभ्यासू आणि त्या भागातील प्रश्नांची व जनतेच्या समस्यांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. यापुर्वी त्यांनी भाजपाकडून पुर्वीच्या केळवली जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले  होते. मात्र भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या भिवंदे यांची या भागातील जनतेशी नाळ जोडलेली आहे.
कायमच या भागातील जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या भिवंदे यांनी पक्षाच्या माध्यमातुन तर कधी वैयक्तीक रित्या या भागातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी काम केले. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे या निवडणूकीत जुवाठी पंचायत समिती गणातुन त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह या भागातील जनतेने केला व जनतेच्या आग्रहामुळेच आपण या निवडणूकीच्या मैदानात उतरल्याचे भिवंदे यांनी सांगितले.
या भागात त्यांना जनतेचा उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. तर या भागातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांच्यासाठी काम करत आहेत. रविवारी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जुवाठी गावातील एका प्रचार सभेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेत भिवंदेना आमचा पाठींबा असल्याचे ठासून सांगत बैठकीला विरोध केला त्यामुळे बैठक गुंडाळावी लागली आहे.
या भागातील जनतेच्या विकासासाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनतेचा मिळणार पाठींबा आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे भिवंदे यांनी सांगितले.