पर्यटन विकासातुन गणाच्या आर्थिक विकासाला गती देणार
राजापूर (प्रतिनिधी) सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडविताना जनतेच्या विकासालाच आपण प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे विकास हाच केंद्र बिंदू ठेवून मी ही निवडणूक लढवत असून माझी बांधिलकी ही जनतेशी आणि जनतेच्या विकासाशी असल्याची प्रतिक्रिया धोपेश्वर पंचायत समिती गणातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांनी व्यक्त केली आहे. खास करून पर्यटन विकासातुन माझ्या धोपेश्वर पंचायत समिती गणाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी नमुद केले.
आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तालुक्यात काम करत असताना त्यांनी कायमच विकासाचे राजकारण आंम्हाला शिकवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राजापूर विधानसभा मतदार संघाचा विकास कशा प्रकारे होतोय व मतदार संघ कसा पुढे जातोय हे आपण सगळे पहात आहोत. त्यामुळे विकास हाच आमचा देखील मुद्दा आहे.
धोपेश्वर पंचायत समिती गणात धोपेश्वर, गोवळ, कोदवली, शिळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, शेढे, कोंढेतड असा भाग येतो. या भागात आजही अनेक समस्या व प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न आणि समस्या भविष्यात सोडवताना हा पंचायत समिती गण एक विकासात्मक प्रगती केलेला गण म्हणून तालुक्यात कसा ओळखला जाईल यासाठी आपले प्रयत्न रहणार असल्याचे नकाशे यांनी सांगितले.
राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत व आमदारर किरण सामंत यांच्या मार्फत भविष्यात तालुक्यात चांगले, पर्यावरण पुरक असे औद्योगिक प्रकल्प येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातुन इथल्या तरूण,तरूणींच्या हाताला काम देतानाच गावातुन मुंबई व अन्य ठिकाणी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, तर गावात उपलब्ध साधन सामुग्रीच्या माध्यमातुन भविष्यात पर्यटन विकासाला गदी कशी मिळेल, त्यातुन आर्थिक प्रगती कशी साधता येईल यासाठीचे आपले नियोजन असल्याचे नकाशे यांनी सांगितले.
रस्ते, विज, पाणी, स्वच्छता हे प्रश्न सोडविणे हे आमचे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे, पण त्याही पलिकडे जाऊन रोजगार निर्मिती, औद्योगिक प्रगती, पर्यटनातुन विकास आणि स्थानिकांच्या हाताला काम हा आमचा विकासाचा अजेंडा असल्याचे नकाशे यांनी सांगितले.
आंम्ही पोकळ आश्वासने देणार नाही, तर केलेले काम आणि भविष्यात करणारे काम जनतेला सांगत आहोत आणि त्यामुळेच आज जनता आमच्या पाठीशी असल्याचे नकाशे यांनी सांगितले.











