इटलीतील आंदोलनकर्ते कोकणातील मायभूमीसोबत; PFAS विरोधी लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ

खेड (प्रतिनिधी) – भारतामध्ये PFAS या ‘फॉरेव्हर केमिकल’च्या उत्पादनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे औद्योगिक वसाहत परिसरात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला इटलीतील PFAS विरोधी आंदोलनकर्तेही उघडपणे समर्थन देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत येथे लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड या कंपनीकडून PFAS रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. PFAS ही अशी रसायने आहेत जी पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. पिण्याच्या पाण्यातील प्रदूषण, कर्करोगाचा धोका, हार्मोन्सवर होणारे दुष्परिणाम यांसारख्या शक्य परिणामांमुळे या रसायनांबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर लोटे परिसरातील स्थानिक नागरिक, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीस दिवसांपासून सातत्याने धरणे आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून PFAS संदर्भात अद्याप स्पष्ट राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आलेले नसताना या रसायनाच्या उत्पादनास परवानगी कशाच्या आधारे देण्यात आली, असा थेट सवाल आंदोलनकर्ते उपस्थित करत आहेत. जोपर्यंत संपूर्ण वैज्ञानिक अभ्यास आणि सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत उत्पादन तात्काळ थांबवावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
दरम्यान, इटली येथील अनुभव या आंदोलनाला अधिक बळ देणारा ठरत आहे. इटलीमध्ये PFAS रसायनांच्या उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी आणि पर्यावरण प्रदूषण झाले होते. विशेषतः व्हेनेटो प्रांतात एका रासायनिक कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे आरोप झाले. त्यानंतर तेथे व्यापक जनआंदोलन उभे राहिले, सरकारी अभ्यास समित्या स्थापन झाल्या आणि अखेरीस संबंधित कारखान्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. अनेक वर्षांनंतरही त्या भागातील नागरिक आजही आरोग्य समस्यांचा सामना करत असल्याचे वास्तव पुढे आले.
याच अनुभवाचा दाखला देत भारतीय आंदोलनकर्ते वेळेत सावधगिरी बाळगण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाला आता इटलीतील PFAS विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर इटलीतील PFAS विरोधी आंदोलनात सक्रिय भूमिका बजावलेल्या मिकेला पिकोली यांचा एक व्हिडिओ संदेश प्रसारित होत असून, त्यांनी भारतातील आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेला नैतिक समर्थन दिले आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर देशांच्या सीमा आड येऊ नयेत, असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या प्रकरणात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र आंदोलनकर्ते या आश्वासनांवर समाधानी नसून, उत्पादन सुरू राहिल्यास भविष्यात मोठा पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत आहेत.
PFAS रसायनांच्या संभाव्य परिणामांबाबत तज्ज्ञ, सरकार आणि उद्योगक्षेत्र यांची भूमिका काय राहणार, तसेच भारत आणि इटलीतील आंदोलनकर्त्यांचा हा संयुक्त लढा पुढे कोणते वळण घेणार, याकडे आता राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.