माजी सभापती परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी

रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणारे जि. प. चे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

हातखंबा जिल्हा परिषद गटात परशुराम कदम यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे.
परशुराम कदम हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून त्यांनी यापूर्वी समाजकल्याण सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र विद्यमान निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या कदम यांनी बंडखोरी करत थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
रत्नागिरी तालुक्यातील ३४ हातखंबा जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे यांच्या विरोधात काम करत त्यांनी पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करत अखेर पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेतला.
जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी याबाबतचे पत्र जाहीर करत परशुराम कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत माहिती दिली आहे.