रत्नागिरी ः प्रतिनिधी
भरधाव दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सूटून अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवार 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा.सुमारास फणसोप हायस्कुलच्या मागे बायपास रोडवर घडली असून यात गंभिर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.
जयप्रकाश चंन्द्रीका यादव (53,मुळ रा.गाझीपूर उत्तरप्रदेश सध्या रा.फणसोप सडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत संभाजी बंकट हुलगे (21,मुळ रा.लातूर सध्या रा.फणसोप सडा,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री जयप्रकाश यादव आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीजे-3856) वर पाठीमागे संभाजी हुलगेला बसवून पावस ते रत्नागिरी रस्त्याने येत होता. त्यांची दुचाकी फणसोप हायस्कुलच्या मागे बायपास रोडवर आली असता दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आला. त्यामुळे जयप्रकाश यादवचे दुचाकीवरील नियंत्रण सूटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या साइड पट्टीच्या बाहेर जाउन अपघात झाला. यात यात रस्त्याच्या बाजूचे चिरे-दगड डोक्याला लागून जयप्रकाश यादव गंभिर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर संभाजी हुलगेलाही दुखापत झाली. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.













