फळांचा राजा ” हापूसचे ” अर्थकारण धोक्यात! ▪️बदलत्या हवामानाचा हापूसला तडाखा.

▪️ नोव्हेंबरचा मोहोर हुकला, सुरुवातीच्या उत्पादनात घटीची शक्यता

▪️संकटांच्या सावटातही हापूसच्या नव्या मोहोराकडे बागायतदारांच्या नजरा.     

मसुरे | झुंजार पेडणेकर :  कोकणच्या ‘हापूसला ‘ मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला एक वेगळी ओळख आणि चांगली किंमत मिळते. हंगामात केवळ आंबा तोडणेच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित अनेक क्षेत्रांत रोजगार निर्माण होतो.कोकणचा हापूस हा केवळ आस्वाद घेण्याचे फळ नसून, तो कोकणच्या समृद्धीचा आणि संस्कृतीचा वार्षिक ‘बोनस’ आहे. हापूसचे अर्थकारण जितके मोठे आहे, तितकेच ते मागील काही वर्ष जोखमीचे देखील बनले आहे.

हवामान बदल, अवेळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे मोहोर गळणे किंवा कीड लागणे यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान होते. यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. मात्र या मोहोराला फळधारणा कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यावर्षीचे आंबा उत्पादन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्याने येणाऱ्या आंबा मोहोरावर आता अवलंबून राहणार आहे. तसेच सुरुवातीला जास्त दर मिळणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची सुद्धा दाट शक्यता व्यक्त होत आहे. आंबा या पिका बाबत सद्यस्थितीत संशोधक, आंबा बागायतदार, कृषी अधिकारी यांच्याकडून जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया बागायतदारांसाठी निश्चितच उपयोगी पडतील.

 

* डॉ. अजय मुंज – आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर – देवगड

 

आंबा पिकास नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात मोहर येण्यास सुरुवात झाली. हा सर्व मोहर पालवी मोहर होता व तो आकाराने खूप लांब होता. या मोहरातील फुले उमलण्याच्या कालावधीत म्हणजेच दहा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत या परिसरातील तापमान १३ ते १५ डिग्री सेल्सिअस इतके होते तर कमाल तापमान ३२ ते ३५ डिग्री सेल्सिअस होते. कमाल व किमान तापमानातील मोठ्या फरकामुळे नर फुलांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून मोहरात परागीभवन न झाल्यामुळे फळ धारणा दिसून आली नाही. त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मोहराचा दुसरा बहर आल्याचे दिसून आले. या मोहरात देखील फळधरण्याचे प्रमाण कमीच होते अशा परिस्थितीत झाडावर केवळ मोहराचे दांडे शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.

आंबा बागायतदारांच्या भेटीमध्ये व लोकांशी चर्चा करताना सगळीकडे सेटिंग अल्प व उशिरा होत असल्याचे आढळून येत आहे.यापुढील मोहोर फुटावा यासाठी शक्य तेवढे जुने मोहराचे दांडे खोडून टाकल्यास नवीन मोहर येण्यास मदत होईल. थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यास नवीन येणाऱ्या मोहरात चांगल्या प्रकारे फळधारणा दिसून येऊ शकते. त्यासाठी बागेत संध्याकाळच्या वेळी काडीकचरा पेटवून धूर करावा, मोठ्या प्रमाणात मोहर येऊन गेला असल्यामुळे झाडातील अन्नद्रव्य कमी झाली आहे अशावेळी फवारणी द्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. ज्या आंबा बागामध्ये फळधारणा झालेली आहे तिथे प्रत्येक झाडाला पंधरा दिवसातून एकदा 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. ओलावा टिकवण्यासाठी गवताचे आच्छादन करावे.यामुळे पाण्याचा ताण कमी होऊन फळगळ थांबेल.

गेले काही दिवस हवामान ढगाळ राहिल्यामुळे मोहरावर फुल कीड आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सुचविलेल्या वेळापत्रकप्रमाणे फवारणी करावी तसेच फुल किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी द्रावणात नीम अर्क किंवा करंज अर्क मिसळावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

@@@@@

*दादा सामंत, भोगवे – वेंगुर्ले

उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्र शासन – फेब्रुवारी महिन्यात जास्त दव पडला तेथे मोहोराला फळधारणा कमी झाल्याचे आढळून येत आहे. दव पडल्यानंतर लगेच फवारणी करणे आवश्यक असते.दव पडल्यानंतर जर चार दिवसानंतर आपण फवारणी केली तर त्याचा कोणताही फायदा होत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे मोहोर जळण्यामध्ये होत आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन मोहर येण्याची प्रक्रिया आता चालू झाली असून ऊन सुद्धा वाढल्यामुळे फळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त तयार होते आणि फळधारणा चांगली होते. मोहर येऊन कणी तयार झाल्यानंतर दव पडला तर त्याचा कोणताही परिणाम फळावर होतं नाही. आपल्याकडील शेतकरी सकाळी दहा नंतर बागेत जातो. त्याऐवजी सकाळी आपल्या आंबा बागेत फिरणे आवश्यक आहे. कारण कीटकांची अळी घालण्याची जी प्रक्रिया असते ती पहाटेच्या वेळी घडून येते. त्यामुळे त्याच वेळी जर कीटकनाशक फवारले तर ते संयुक्तिक ठरते. वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीचा भाग वगळता अन्य भागात मोहर जळण्याचे प्रमाण जास्त आहे. किनारपट्टीलगत खारी हवा आणि उबदारपणा यामुळे हे प्रमाण तुलनेने कमी आहे.गेली 35 वर्ष जिल्ह्यात एक मालक आणि एक व्यापारी आणि प्रति वर्षी आंबा पीक हे तत्व आपण जपले आहे. झाडांना वयानुसार खत घालू नये तर त्या झाडाच्या विस्तारानुसार खत वापरावे. खत घालताना मुळापासून साडेतीन फूट अंतरावर खत घालणे आवश्यक आहे. आणि हे खत जून ते जुलैमध्ये घालावे फांद्या छाटणी योग्य प्रकारे करायला हवी जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्णपणे खोडा पर्यंत पोहोचेल असे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार दादा सामंत यांचे म्हणणे आहे.

 

@@@@@@

उमाकांत पाटील – उपविभाग कृषी अधिकारी कणकवली.-

आंबा पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन- भरघोस उत्पादनासाठी फवारणी वेळापत्रक महत्वाचे आहे.

आंबा पिकात मोहोर येणे, फळधारणा आणि फळांचे पोषण हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. या काळात योग्य अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास फळगळ रोखली जाते आणि फळांचा दर्जा व वजन सुधारून उत्पादनात वाढ होते.

मोहोर अवस्था (फुलोरा येताना)

मोहोराची गुणवत्ता व परागीकरण सुधारण्यासाठी ०:५२:३४ आणि बोरॉनची फवारणी करावी. मोहोर अवस्था असताना खते आणि अन्नद्रव्ये

०:५२:३४ + बोरॉन (२०%) प्रमाण (प्रति १० लि. पाणी) ७५-१०० ग्रॅम + २० ग्रॅम द्यावीत.फळधारणा अवस्था (वाटाणा आकार) नैसर्गिक फळगळ थांबवण्यासाठी १३:००:४५ आणि प्लॅनोफिक्सचा (NAA) वापर करावा.

खते आणि अन्नद्रव्ये१३:००:४५ + प्लॅनोफिक्स यांचे प्रमाण (प्रति १० लि. पाणी) १०० ग्रॅम + ३ ते ४ मिली असावे.

* फळांच्या पोषणाची अवस्था (लिंबू आकार)फळांचे वजन, चकाकी आणि साखर वाढवण्यासाठी ०:००:५० व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारावीत. वाढीची अवस्था

खते आणि अन्नद्रव्ये ०:००:५० + सूक्ष्म अन्नद्रव्येप्रमाण (प्रति १० लि. पाणी)१०० ग्रॅम + ३०-४० ग्रॅम.

फवारणीची योग्य वेळ कडक ऊन टाळून सकाळी १० च्या पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर फवारणी करावी.जमिनीतील ओलावा आणि पद्धत फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा आणि संपूर्ण झाड व्यवस्थित ओले व्हावे.

रोग नियंत्रण समन्वय तुडतुडे किंवा भुरीचा प्रादुर्भाव असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक/बुरशीनाशक मिसळावे.

आंबा पिकासाठी कीड व रोग नियंत्रण सुद्धा महत्वाचे आहे. तुडतुडे आणि फुलकिडे बंदोबस्त करण्यासाठी इमिडाक्लोप्रीड (३ मिली) किंवा थायमेथोक्साम (२ ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी मोहोरावरील पांढऱ्या पावडरीसाठी हेक्झाकोनॅझोल (१० मिली) किंवा विद्राव्य गंधक (२० ग्रॅम) वापरावे. एकाच वेळी कीड आणि रोग दोन्ही असल्यास वापरायची औषध मिश्रणे (१० लिटर पाण्यासाठी)पुढील प्रमाणे आहेत.

औषध मिश्रण (१० लिटर पाणी) पुढील प्रमाणे आहे.

तुडतुडे + भुरी साठी इमिडाक्लोप्रीड (३ मिली) + हेक्झाकोनॅझोल (१० मिली). फुलकिडे + भुरी साठी थायमेथोवसाम (२ ग्रॅम) + विद्राव्य गंधक (२०ग्रॅम).करपा रोग साठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (२-३ ग्रॅम प्रति लिटर) वापरावे.

औषधांची आलटून-पालटून फवारणी करावी.कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी कीटकनाशक बदलून वापरावे.खोडावर फवारणी आणि स्टिकरचा वापर करावा.

तुडतुडे खोडावर लपलेले असल्याने खोडावरही फवारणी करावी व औषध चिकटण्यासाठी स्टिकर वापरावे. मधमाश्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.झाड पूर्ण फुलो-यात असताना परागीकरणासाठी मधमाश्यांची गरज असते तेव्हा तीव्र औषधे टाळावीत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

फोटो : उमाकांत पाटील

@@@@@

श्री. प्रसाद बागवे – प्रगतशील आंबा बागायतदार मुणगे – देवगड

गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोहोर चांगला आला. अर्थातच आंबा बागायतदारांनी सुरवातीपासूनच फवारणी, नेपाळी कामगार , खत आदी गोष्टीचे व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करत होणाऱ्या खर्चाची तमा न बाळगता काळजीपूर्वक केले. परंतु आता कणी सेटिंगच नसल्याने आंबा शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात काही प्रमाणात आलेली कणी सुद्धा बदलत्या वातावरणामुळे आणि दुबार होणाऱ्या फु्टीमुळे फळगळ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था धरणीने टाकलं आणि आभाळाने झोडपलं तर दाद कोणाकडे मागायची अशी झाली आहे. तसेच आंबा हा शेतकरी वर्गाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे बजेट यावर अवलंबून असते. सद्य परिस्थिती मुळे कामाला ठेवलेल्या नेपाळी कामगारांचे पगार, खरेदी केलेल्या बागांची रक्कम, औषधं खर्च अशी अनेक संकटे समोर आहेत. अर्थात शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून मदतीसोबत या भागात प्रयोगशाळा उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

 

@@@@@@

गणेश उर्फ अवी नेरकर – आंबा बागायतदार कोळंब- मालवण सध्या वातावरण दिवसेंदिवस बदलत असल्यामुळे या संकटाला सामोरे जाऊन आंबा पीक टिकवण्याचे आंबा बागायतरांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अद्यापही आंबा उत्पादनाचे चित्र स्पष्ट होत नाही आहे. यावर्षी आंबा कलमाना जास्त प्रमाणात मोहोर आल्यामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे चालू हंगामात उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती आम्हा आंबा बागायतदारांची झाली आहे.

 

@@@@@@@@@

भूषण बोडस – आंबा बागायतदार पडेल, देवगड

यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात आंबा कलमे मोहरली. त्यामुळे सर्व आंबा बागायतदार वर्ग प्रचंड उत्साहात होता. त्याच उत्साहाने मोठ्या स्वरूपात कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या गेल्या. या वर्षी आंबा पीक खूप होईल अशी आशा होती परंतु संपूर्ण मोहोर करपून काळा पडून फुकट गेला. पहिल्या टप्प्याच्या मोहराला कणी सेटिंग झाली नाही आणि लाखो रुपये खर्च करून आंबा उत्पादक शेतकरी मात्र कर्जबाजारी झाला. अजूनही देवगड तालुक्यात दुसऱ्या टप्प्याच्या मोहराची प्रक्रिया चालू आहे. परंतु शेतकरी अगोदरच आपल्या बजेटचे पैसे फवारणीसाठी संपऊन बसला आहे. तसेच या मोहराचे आंबे मे महिन्यात तयार होत असल्याने त्यातून उत्पन्न ते किती मिळणार याचीही खात्री नसल्याने आता आंबा बागेत अजून किती खर्च करावा या विवंचनेत बागायतदार अडकला आहे.

 

एकूणच कोकण आणि हापूस आंबा यांचे नाते केवळ भौगोलिक नसून ते कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. हापूसला ‘फळांचा राजा’ म्हटले जाते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे हापूसच्या पिकावर अवलंबून आहे. बागायतदार, शेतमजूर, आणि स्थानिक व्यापारी यांच्यासाठी हे वर्षातील सर्वात मोठे उत्पन्नाचे साधन असते.आता यावर्षीच्या संपूर्ण उत्पादनाचे भवितव्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मोहोरावर अवलंबून आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, कृषी संशोधक आणि तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना आणि प्रतिक्रिया बागायतदारांसाठी दिशादर्शक ठरणार असून, बदलत्या निसर्गाशी जुळवून घेत हापूसचे अस्तित्व टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे.